इसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 31 ऑक्टोबर : राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाजाला जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच उद्या (1 नोव्हेंबर) रोजी होणाऱ्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. यासोबतच शहरासह ग्रामीण भागात लावलेले बॅनर खाली उतरवण्याचे आदेश आमदार किशोर पाटील यांनी दिले आहेत. आज पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा देणार का, या विषयावरही आमदार किशोर पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
आमदार किशोर पाटील काय म्हणाले? –
राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आमदार, खासदार मराठा आरक्षणाला पाठिंबा देत राजीनामा देत आहेत. याबाबत बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये दोन-तीन खासदार आणि आमदार यांनी राजीनामा दिल्याच्या बातम्या ऐकल्या आहेत. माझा राजीनाम्याने जर मराठा बांधवांचा प्रश्न सुटणार असेल तर मी अर्ध्या रात्री राजीनामा द्यायला तयार आहे. पण मला असं वाटतं की, आपण पदाचा राजीमाना देऊन लढू शकत नाही. जर तुम्हाला लढायचं असेल, न्याय द्यायचा असेल तर त्या पदावर राहूनच तुम्ही न्याय देऊ शकतात आणि म्हणून जर आज मी पदाचा राजीनामा दिला तर मला आमदार म्हणून सभागृहात जाण्याची परवानगी मिळणार नाही. सभागृहात मला बसता येणार नाही. सभागृहामध्ये समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जे काही मी केलं पाहिजे ते मला करता येणार नाही. म्हणून निश्चितपणे मी आमदार राहूनच या महाराष्ट्रातील मराठा बांधवाना न्याय मिळवून देण्यासाठी माझ्या सत्तेचा सदुपयोग करुन लवकरात लवकर कसा न्याय मिळवून देता येईल हा प्रयत्न मी करेन, या शब्दात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आज पाचोरा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
वाढदिवसाचे कार्यक्रम रद्द –
मराठा आरक्षणाला पाठींबा देत आमदार किशोर पाटील म्हणाले की, राज्यात कोणत्याही गावातील विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा यानंतर मी करणार नाही. माझ्याजवळ असलेला पूर्ण वेळ मी मराठा बांधवांच्या पाठपुराव्यासाठी देण्याचा प्रयत्न करेन. मला विश्वास आहे की या राज्याचे मुख्यमंत्री जो शब्द देतात ते पाळतात. दसरा मेळाव्यामध्ये त्यांनी सर्वांसमोर या राज्याचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन राज्यातील तमाम मराठा बांधवांना आश्वासन दिलं आहे आणि म्हणून मी आज हा ठोसपणे निर्णय घेतला आहे.
मागच्या दीड वर्षांपासून मुख्यमंत्री महोदयांनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार घेतला त्या दिवसापासून अनेक विकासकामे 100 टक्के मार्गी लावण्याचे काम त्यांनी केले आहे. आज खऱ्या अर्थाने राज्यातील मराठा बांधवांना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हेच न्याय देतील, याचा मला आणि महाराष्ट्रातील जनतेला विश्वास आहे. जरांगे पाटील साहेबांनी राज्यातील मराठा बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी अतिशय शांततेच्या पद्धतीने सुंदर अशा आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. त्या आंदोलनाला यश येईल, अशा पद्धतीची वेळ आता वेळ आली आहे आणि म्हणून यश येताना कुठेतरी अडथळा निर्माण होऊ नये, अशा या कृत्याने जनतेचं, महाराष्ट्राचं शासनाचं आणि आपलं, कोणाचंही नुकसान होऊ नये, याची काळजी घेऊन, कारण मला असं वाटतं, जगाने ज्याची नोंद घेतली, असे मराठा बांधवांचे लाखोंच्या संख्येने मोर्चे निघाले. त्याला कुठेही गालबोट लागले नाही. त्यामुळे तो आदर्श ठेवून आताही कुठेही गालबोट लागणार नाही, याची काळजी मराठाप्रेमींनी घ्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली.
विशेष अधिवेशनासंदर्भात आमदार किशोर पाटील काय म्हणाले –
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विशेष अधिवेशन घेण्याबाबत विनंती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबत बोलताना ते म्हणाले की, मला असं वाटतं मुख्यमंत्री महोदयांनी राज्यपाल महोदयांकडे अशा पद्धतीची मागणी केली असावी. पण ती केली नसेल तर मी मतदारसंघाचा आमदार म्हणून राज्यातील हा तिढा सुटण्यासाठी तत्काळ अधिवेशन बोलावून चर्चा करुन सर्वानुमते ठराव करुन याला तातडीने मार्ग काढण्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करेन. मराठा आरक्षण सोडून दुसऱ्या कोणत्याही विषयावर त्या अधिवेशनामध्ये चर्चा नसावी, फक्त आणि फक्त मराठी बांधवांना न्याय मिळण्यासाठीच्या विषयावर चर्चा व्हावी, अशा पद्धतीची मागणीही मी करणार, असे ते म्हणाले.
उद्याच्या बैठकीसाठी मुंबईत हजर राहणार –
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करतंय, या प्रयत्नांना यश आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. मराठा आरक्षणाचा प्रश्न हा काही आता निर्माण झालेला नाही. हा प्रश्न मागच्याही काळात होता. परंतु त्याला यश येऊ शकलं नाही. सुप्रीम कोर्टात ते टिकू शकलं नाही. त्यामुळे टिकणारं आरक्षण हवं असेल तर शासनाला वेळ द्यायला हवा, असेही ते यावेळी म्हणाले. कायम स्वरुपी टिकणारं आरक्षण हे राज्यातील मराठा बांधवांना मिळायला हवं, या मताशी मी आणि संपूर्ण राज्यकर्ते मराठा बांधवांच्या पाठीशी आहेत. उद्या संध्याकाळी 6 वाजता मुख्यमंत्री महोदयांनी आमदार आणि खासदार यांची बैठक बोलावलेली आहे. उद्याचा त्यांचा वाढदिवस रद्द करुन या बैठकीलाही ते हजर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.