चाळीसगाव, 29 एप्रिल : चाळीसगाव तालुक्यात अनेक शेतकऱ्यांना हजारोंच्या विहिरी व बेघरांना घरकुल मंजूर केले होते. मात्र, पंचायत समिती मधील रोहयो विभागातील एपीओ, टिपीओ, ज्यू इंजिनिअर व वरिष्ठ अधिकारी यांनी परस्पर मंजुरीच्या व जिओ टॅगच्या नावाने प्रत्येक शेतकऱ्यांकडून 20 ते 25 हजार रुपये लाच घेतली जाते, असा आरोप करत शेतकऱ्यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या.
दरम्यान, एवढे पैसे देऊनही शेतकऱ्यांच्या विहिरींचे व घरकुलांचे बिल निघत नसल्याने अखेर आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे काही शेतकरी तक्रारी घेऊन आले. यानंतर आमदार चव्हाण यांनी स्वतः शेतकऱ्यांसह पंचायत समिती कार्यालय गाठत गटविकास अधिकारी व संबंधितांची कानउघाडणी केली.

…अन् आमदार आमदार चव्हाण यांनी गाठलं पोलीस स्टेशन –
गोरगरीब शेतकऱ्यांकडून पैसे लुबाडण्याचे हे पंचायत समितीमध्ये सिंडिकेट असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार फोफावला आहे. पैसे दिल्याशिवाय काम होत नाही अशी पंचायत समितीची प्रतिमा झाली असल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले. दरम्यान, उपस्थित शेतकऱ्यांसह आमदार चव्हाण यांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठत पंचायत समिती मधील संबंधित भ्रष्टाचारी अधिकारी व कर्मचारी यांच्याविरोधात रीतसर तक्रार दिली आहे.
फसवणूक झालेल्यांनी माझ्याकडे तक्रार करावी –
चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना व घरकुल धारकांना विनंती आहे की ज्यांच्याकडून विहिरी व घरकुल मंजुरी साठी पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी यांनी पैसे घेऊन फसवणूक केली असेल त्यांनी पुढील दोन दिवसात आपली तक्रार देण्यासाठी माझ्याशी किंवा माझ्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन आमदार चव्हाण यांनी केले आहे. तसेच तालुक्यातील सर्व तक्रारदार शेतकऱ्यांना घेऊन संबंधित अधिकारी-कर्मचारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल आणि फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे मंगेश चव्हाण यांनी सांगितले आहे.
हेही पाहा : UPSC Yogesh Patil Success Story : जळगावच्या 26 वर्षांच्या तरुणाचं UPSC परिक्षेत घवघवीत यश