चाळीसगाव, 20 मे : नागरिकांच्या हितासाठी उचलेल्या पावलामुळे चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण ह्यांच्या कृतीची सर्वत्र चर्चा केली जाते. अशातच चाळीसगावात एका व्यक्तीकडून पोलिसांनी खंडणी उकळल्याप्रकरणी आमदार मंगेश चव्हाण यांनी थेट पोलीस स्टेशन गाठत संबंधित पोलीस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यानंतर पोलिसाविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अजय पाटील असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिसाचे नाव आहे. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी अजय पाटील याच्यावर निलंबनाची कारवाई केलीय.
नेमकं काय घडलं? –
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरातील रहिवासी स्वप्नील भाऊसाहेब राखंडे यांचा कॉम्प्युटर टायपिंगचा क्लास असून दोन पोलिसांनी येत त्यांना धमकवत खंडणीची मागणी केली होती. निखिल राठोड कोम असल्याची विचारणा करत तुमच्या क्लासमध्ये अत्याचाराची घटना घडली असून तुमच्यासह भावाविरोधात गुन्हा दाखल होईल, अशी धमकी त्या पोलिसांनी स्वप्नील राखुंडे यांना दिली होती. यानंतर गुन्हा दाखल न होण्यासाठी पैशांची मागणी केली होती. यामध्ये स्वप्नील राखुंडे यांच्याकडून 1 लाख 20 हजार रुपये खंडणी संबंधित पोलिसांने घेतली. दरम्यान, पैसे उकळण्याचा प्रकार समजताच त्यांनी 19 मे रोजी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
…अन् मंगेश चव्हाण यांनी गाठलं पोलीस स्टेशन –
चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यापर्यंत ही बाब पोहचल्यानंतर त्यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन गाठत संबंधित पोलिसाविरोधात 3 लाख रूपये खंडणी मागितल्याचा आरोप करत खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान, सुरूवातीला पोलीस गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचे समजताच, जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत पोलीस स्टेशनमधून जाणार नाही, अशी भूमिका आमदार चव्हाण यांनी घेतली. यानंतर पोलीस हवालदार अजय पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी आमदार चव्हाण यांनी पोलीस स्टेशनचे निरिक्षक किरणकुमार कबाडी यांना धारेवर धरले.
पोलिसावर निलंबनाची कारवाई, पोलीस निरिक्षकांची उचलबांगडी –
चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस हवालदार अजय पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या घरून त्याने खंडणी घेतलेले 1 लाख 20 हजार रुपये देखील त्याच्या घराच्या झडतीत हस्तगत करण्यात आले. यानंतर जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी अजय पाटील याच्यावर निलंबनाची कारवाई केली. तसेच चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांची देखील नियंत्रण कक्षात बदली केलीय. चाळीसगावच्या खंडणी प्रकरणामुळे जळगाव जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
मंगेश चव्हाण यांची फेसबूक पोस्ट –
कायद्याचे रक्षक जर भक्षक होऊन सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरत खंडणी उकळत असतील तर ते कदापिही सहन केले जाणार नाही. या प्रकरणाच्या बाबतीत मी राज्याचे मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे तक्रार करणार असून यात सहभागी सर्व पोलिसांची IPS दर्जाच्या अधिकारी यांच्याकडून चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले. तसेच मी माझ्या आमदारकीच्या पहिल्या दिवसांपासून अश्या प्रवृत्तीच्या विरोधात असून मग तो कितीही मोठा व्यक्ती असो किंवा जवळचा असो त्याला योग्य ते शासन व्हावे व पीडित नागरिकांना न्याय मिळावा असा माझा प्रयत्न राहत आला आहे.
माझी सर्व चाळीसगावकरांना विनंती आहे की, शासन प्रशासनातील कुणीही आपल्याला त्रास देत असेल, कुठेही पैश्यांची मागणी होत असेल, अडवणूक होत असेल, पोलिसांकडून न्याय मिळत नसेल तर आपण विनासंकोच माझ्याशी कधीही संपर्क साधा. मंगेश चव्हाण अश्या नागरिकांच्या पाठीशी कायम उभा राहील याची ग्वाही मी देत असल्याचे त्यांनी फेसबूक पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे.