जळगाव, 22 जानेवारी : जळगाव महापालिकेत ओबीसी महिला आरक्षण निघाल्यामुळे मनापासून स्वागत करतो. कारण, आज महायुतीत जवळपास आठ ते नऊ महिला उमेदवार ह्या ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेल्या आहेत. यामुळे नक्कीच स्वागातार्थी हे आरक्षण निघालंय. यामाध्यमातून, जळगाव शहराचा सार्वजनिक विकास करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे, अशी प्रतिक्रिया जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजू मामा) यांनी व्यक्त केली आहे. जळगाव महानगरपालिकेचे महापौर पदाचे आरक्षण हे ओबीसी (महिला) प्रवर्गासाठी जाहीर झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार भोळे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
महापौर पदाचा उमेदवार कधी जाहीर होणार? –
जळगावात महापौर पदाचे आरक्षण हे ओबीसी (महिला) प्रवर्गासाठी जाहीर झाल्यानंतर आता महायुतीकडून कोणाला संधी मिळणार याविषयी उत्सुकता आहे. याबाबत बोलताना आमदार सुरेश भोळे म्हणाले की, पक्षातील ज्येष्ठतेनुसार कोअर कमिटीच्या माध्यमातून चर्चेद्वारे महापौर पदाच्या उमेदवार निवडीबाबतचा निर्णय घेतला जाईल. तसेच महापालिकेकडून महापालिकेकडून महापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर महायुतीकडून दोन दिवस अगोदर महापौर पदाचा उमेदवाराची घोषणा केली जाईल.
‘संघटनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न’ –
दरम्यान, महापौर पदाची संधी देताना महिला उमेदवाराची जेष्ठता बघितली जाईल. महापालिकेत दुसऱ्यांदा-तिसऱ्यांदा कोण निवडून आलेले आहेत. यानंतर कोअर कमिटीच्या माध्यमातून चर्चेद्वारे याबाबतचा निर्णय घेतला जाईल. वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला प्राधान्य दिले जाईल. अडीच किंवा तीन वर्ष महापौर पद देणं शक्य असेल तर त्याबाबतचा देखील निर्णय घेण्यात येईल. मागच्या वेळेस देखील पाच वर्षात अडीच-अडीच वर्ष महापौर पद वाटून दिले होते. संघटनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचेही आमदार सुरेश भोळे म्हणाले.
जळगाव महानगरपालिकेचे महापौर पद ओबीसी महिला उमेदवारासाठी आरक्षित –
महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौर पदासाठी आरक्षणाचे वाटप घोषित केले आहे. यानुसार, जळगाव महानगर पालिकेत महापौर पद ओबीसी महिला उमेदवारासाठी आरक्षित करण्यात आले आहे. दरम्यान, महापालिकेचे महापौर पदाचे आरक्षण ओबीसी महिला असे करण्यात आल्यानंतर आता कोणाची महापौर पदी वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
हेही वाचा : Breaking! राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये महापौर पदांचे आरक्षण जाहीर; संपुर्ण यादी वाचा एका क्लिकवर






