पुणे, 12 मार्च : लोकसभा निवडणुक जवळ आली असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. वसंत मोरे यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. मोरे यांनी राज ठाकरे यांना पत्र लिहित, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
अखेरचा जय महाराष्ट्र साहेब मला माफ करा –
वसंत मोरे यांनी ट्विटर याबाबत माहिती देत लिहिले आहे, अखेरचा जय महाराष्ट्र साहेब मला माफ करा…. माझ्या नाराजीचा कडेलोट झाला, त्यामुळे मी आता पक्ष सोडला आहे. माझ्याविरोधात सातत्याने काही गोष्टी पसरविल्या जात होत्या. तसेच त्या गोष्टींची शहानिशा न करता मला निष्ठा सिद्ध करावी लागत होती. मी फक्त अग्निपरीक्षाच देणे बाकी होते.
काय आहे कारण? –
पक्षामध्ये अंतर्गत अनेक गोष्टी असून पुणे शहरांतून लोकसभा लढवण्यासाठी मी इच्छुक होतो. माझ्याबाबत राज ठाकरेंपर्यंत वारंवार नकारात्मक गोष्टी पोहचवल्या गेल्या. त्यामधून कुठलीही शहानिशा न करता, माझ्यावर आरोप केले गेले. वसंत मोरे स्वकेंद्रीत राजकारण करतो, असेही आरोप केले गेले. वास्तविक, मी हे कधीही केले नाही. जे काही केले ते पक्षहितासाठीच केले, असे वसंत मोरे यांनी म्हटले आहे.
ते पुढे म्हणतात की, माझ्यावर तसेच माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले गेले. त्यामुळे आता माझ्यापुढे काही पर्याय राहिला नव्हता. मी कुठल्या पक्षात जाणार काय निर्णय घेणार, हे येत्या दोन दिवसांत स्पष्ट करेन. मी मनसे सोडली असून सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. राज ठाकरे यांनी माझा राजीनामा स्विकारावा, असे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : दुखःद! बैलगाडी उलटी झाल्याने 13 वर्षीय मुलाचा मृत्यू, जळगाव तालुक्यातील वाकडी गावाजवळची घटना