जळगाव, 29 जुलै : राज्यातील विविध भागात अतिमुसळधार पाऊस झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यात कालपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. आज देखील सकाळपासून जिल्ह्यातील काही भागात संततधार पाऊस होत आहे.
जळगावात पावसाची रिपरिप सुरू –
जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 346 मिमी पाऊस झाला आहे. काल, रविवारी दिवसभर जळगाव शहरासह जवळपास सर्वच तालुक्यात पावसाची रिपरिप सुरू होती. जळगाव शहरात गेल्या चार दिवसांपासून सुर्यदर्शन झालेले नाहीये. विशेषतः जळगाव शहरात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसाने जोर घेतला असून या महिन्यातील आतापर्यंतच्या 28 दिवसांपैकी 26 दिवस जळगाव तालुका व शहरात पावसाने हजेरी लावली आहे.
1 ऑगस्टपासून जोरदार पावसाचा अंदाज –
हवामान विभागाने 31 जुलैपर्यंतच्या चार दिवसांत मराठवाडा, तसेच नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे येथे मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच राज्यातील काही भागात 1 ऑगस्टपासून जोरदार पावसाचा अंदाज देखील व्यक्त करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज –
जळगाव जिल्ह्यातील काही भागात आज पावसाची रिपरिप सुरू आहे. तसेच जळगाव जिल्ह्यात पुढील तीन दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात एकीकडे शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत असताना संततधार पावसामुळे शेतीकामे खोळंबल्याचे देखील दिसून येते.
कोल्हापूरात पूरस्थिती कायम –
कोल्हापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती कायम आहे. कोल्हापूरातील अनेक भागांमध्ये पूरस्थिती कायम असल्यामुळे कोल्हापूर शहर, करवीर आणि शिरोळ तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, पूरस्थिती लक्षात घेता नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.
हेही वाचा : शासनाच्या योजना शेवटच्या माणसांपर्यंत पोहचविण्यासाठी काम करा, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे प्रतिपादन