भुसावळ : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची मुलगी आणि तिच्या मैत्रिणीसोबत मुक्ताईनगर येथील संत मुक्ताईच्या यात्रेत छेडछाड केल्याची घटना समोर आली. यानंतर या घटनेने राज्यात एकच खळबळ उडाली. दरम्यान, याप्रकरणी सरकारी वकिलांनी महत्त्वाची माहिती दिली.
याप्रकरणी भुसावळ येथील विशेष सत्र न्यायालयाने अटक करण्यात आलेल्या 3 आरोपींना 5 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर एका अल्पवयीन आरोपीला जळगावातील बाल न्याय मंडळापुढे हजर करण्यात आले. मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांनी काल भुसावळ विशेष सत्र न्यायालयात तिन्ही संशयितांना बंदोबस्तात हजर केले.
आतापर्यंत 4 जणांना अटक –
मुक्ताईनगर छेडछाडप्रकरणी आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये मुख्य आरोपी अनिकेत भोई याचाही समावेश आहे. तर किरण माळी, अनुज पाटील अशी इतर अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यासोबतच आणखी एक अल्पवयीनला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. एकूण 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 7 पैकी 4 जणांना अटक करण्यात आलेली आहे.
सरकारी वकिलांनी दिली महत्त्वाची माहिती –
या प्रकरणातील सरकारी वकील संजय सोनवणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मुक्ताईनगर घटनेच्या संदर्भातील हा बाललैंगिक अत्याचाराचा अतिशय गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे. यामध्ये एकूण 7 आरोपींविरोधात फिर्याद दाखल आहे. मुक्ताईनगर पोलिसांनी तीन आरोपींना अटक करुन कोर्टात हजर केले. या घटनेमध्ये ज्या मोबाईल फोनमधून या आरोपींनी चित्रीकरण केलेले आहे, तो मोबाईल जप्त करायचा आहे, इतर फरार आरोपींचा शोध घ्यायचा आहे, या कारणांसाठी पोलीस कस्टडी मिळावी अशी मागणी सरकार पक्षातर्फे करण्यात आली होती. सरकार पक्षातर्फे आणि आरोपी पक्षातर्फे यावेळी युक्तीवाद करण्यात आला. यामध्ये विशेष न्यायालयाने अटक करण्यात आलेल्या तीनही आरोपींना 5 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपींना अटक करुन 12 तास झालेले आहेत, त्यामुळे कोणतीही पोलीस कोठडीची गरज नाही, अशी मागणी आरोपीच्या वकिलांनी केलेली होती. पण यामध्ये न्यायालयाने 5 मार्चपर्यंत आरोपींना पोलीस कोठडीची आमची मागणी मान्य केलेली आहे, अशी माहिती या प्रकरणातील सरकारी वकील संजय सोनवणे यांनी दिली.
या प्रकरणात एकूण 7 आरोपी आहेत. त्यापैकी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. एक जण अल्पवयीन असल्याने त्याला जळगाव येथे हजर केलेले आहे. इतर 3 फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांनी दिली.
हेही वाचा – संतापजनक! केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, नेमकं काय घडलं, संपूर्ण घटनाक्रम..