चाळीसगाव/दावोस, 22 जानेवारी : स्वित्झर्लंडमधील दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फॉरम 2026 च्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रासाठी मोठ्या गुंतवणूक करार होत असताना चाळीसगाव तालुक्यासाठी मोठी बातमी समोर आली आहे. चाळीसगाव तालुक्यात सुमारे १५,००० कोटी रुपयांचा Sustainable Aviation Fuel (SAF) प्रकल्प उभारण्याचा सामंजस्य करार महाराष्ट्र शासन व अमेरिका सॅन फ्रान्सिस्को येथील ACTUAL HQ कंपनीसोबत करण्यात आला आहे. याबाबतची माहिती चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सोशल मीडियाच्या माध्यामातून दिली आहे.
चाळीसगावात उभारला जाणार जागतिक दर्जाचा महाप्रकल्प –
चाळीसगावात ऊस, मका, कापूस, बांबू व शेतीतील टाकाऊ अवशेषांपासून विमानांसाठी वापरले जाणारे हरित इंधन तयार करणारा हा देशातील मोजक्या आणि जागतिक दर्जाचा हा महाप्रकल्प उभारला जाणार आहे. ही बाब प्रत्येक चाळीसगावकरासाठी अभिमानाची आहे. गेल्या वर्षभरापासून चाळीसगावमध्ये मोठा उद्योग यावा, शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला नवे स्रोत मिळावेत आणि आपल्या तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करत होतो. आज त्या प्रयत्नांना यश आल्याच्या भावना आमदार मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केल्या आहेत.
3000 हून अधिक युवकांना रोजगार मिळणार –
ACTUAL HQ, Sankla Renewables आणि SCUBE Infra यांच्या माध्यमातून विकसित होणाऱ्या या प्रकल्पातून थेट 3000 हून अधिक युवकांना रोजगार मिळणार असून, शेतकरी, वाहतूक व सेवा क्षेत्रामध्ये हजारो अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतील. FPO मार्फत शेतकऱ्यांकडून दीर्घकालीन कराराने कृषी अवशेष खरेदी केली जाणार असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला नवे स्थैर्य मिळणार आहे.
View this post on Instagram
विकासाच्या दिशेने मोठे पाऊल –
मुंबई–आग्रा महामार्ग, समृद्धी महामार्ग व रेल्वे कनेक्टिव्हिटीमुळे चाळीसगावची लॉजिस्टिक क्षमता या महाप्रकल्पासाठी अत्यंत अनुकूल ठरली आहे. हा प्रकल्प 100% नवीकरणीय ऊर्जेवर आधारित असून पर्यावरणपूरक विकासाच्या दिशेने मोठे पाऊल ठरेल. चाळीसगावच्या औद्योगिक नकाशावर सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा हा १५ हजार कोटींचा SAF महाप्रकल्प प्रत्यक्षात येत आहे.
प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करण्याचा माझा संकल्प –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चाळीसगावकरांच्या आशीर्वादाने हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करण्याचा माझा संकल्प असून ही फक्त सुरुवात आहे. चाळीसगावच्या सर्वांगीण विकासाचा प्रवास अजून खूप मोठा असल्याचेही आमदार मंगेश चव्हाण यांनी स्पष्ट केलंय.






