चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
मुंबई, 1 मे : गेल्या महिनाभरापासून राज्यातील महत्वाच्या लोकसभा मतदारसंघापैकी असलेल्या काही मतदारसंघाचा महायुतीत जागावाटपाचा पेच निर्माण झाला होता. यामध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश होता. नाशिक लोकसभा मतदारसंघात तीनही पक्षाकडून दावा करण्यात आल्यामुळे उमेदवारीवरून तिढा कायम होता. मात्र, आज अखेर नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेने उमेदवाराच्या नावाची घोषणा केली.

हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर –
महायुतीत नाशिक लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटेला आला असून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोडसे यांच्या नावाची घोषणा करत नाशिक मतदारसंघ हा त्यांच्याकडे कायम ठेवला आहे. हेमंत गोडसे यांचा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्याविरोधात निवडणुकीचा सामना रंगणार आहे.
लोकसभा निवडणूक – २०२४ साठी नाशिक मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून हेमंत गोडसे यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा !#Shivsena #LokasabhaElection2024 pic.twitter.com/R8Ykv8WUXs
— Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc) May 1, 2024
हेमंत गोडसे पुन्हा निवडणुकीच्या मैदानात –
शिवसेनेकडून उमेदवारी म्हणून जाहीर करण्यात आलेले हेमंत गोडसे हे सध्या नाशिक लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. लोकसभा निवडणुक 2014 च्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळांचा पराभव करत पहिल्यांदा खासदारकी मिळवली. यानंतर ते पुन्हा एकदा निवडून आले. दरम्यान, गोडसे हे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात असून हॅट्ट्रिक करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.