चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 9 जून : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचा आज शपथविधी संध्याकाळी 7.15 वाजता नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनाच्या परिसरात पार पडणार आहे. होणार आहे. नरेंद्र मोदी आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार असून त्यांच्यासोबत एनडीएचे 40 ते 45 खासदार देखील मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यामध्ये रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांना देखील मंत्रीपदाची संधी मिळाली आहे.
रक्षा खडसे यांना मिळणार केंद्रीय मंत्रीपद –
उत्तर महाराष्ट्रातून रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांच्या वाटेला केंद्रीय मंत्रीपद आले असून ते आज संध्याकाळी मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. सलग दोन वेळा खासदार राहिलेल्या रक्षा खडसे यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांचा दोन लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. दरम्यान, महाराष्ट्रातील महायुतीतील एकमेव महिला खासदार असल्याने त्यांना केंद्रीय मंत्रीपद मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर ते आज संध्याकाळी शपथ घेणार आहे. यासाठी रक्षा खडसे या आधीच दिल्लीत असून त्यांचे कुटुंबीय दिल्लीला रवाना झाले आहे.
जिल्ह्याला तब्बल 17 वर्षांनंतर मिळाले केंद्रीय मंत्रीपद –
भारताच्या 14 व्या लोकसभेत एरंडोल लोकसभा मतदारसंघातून खासदार असलेले एम. के. अण्णा पाटील हे तत्कालीन पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्री पदाची संधी मिळाली होती. त्यांनी ग्रामीण विकास राज्यमंत्री या पदाचा कार्यभार 2004 ते 2007 याकाळात सांभाळला होता. त्यानंतर मात्र जिल्ह्यातील कोण्याही खासदाराला केंद्रात मंत्रीपदाची संधी मिळाली नव्हती. रक्षा खडसे ह्या राज्यातून दुसऱ्या क्रमाकांचे मताधिक्य मिळवत तिसऱ्यांदा खासदार बनल्या आहेत. तसेच राज्यातील महायुतीच्या त्या एकमेव महिला खासदार आहेत. यामुळे त्यांना केंद्रात मंत्रीपद मिळाले असून जळगाव जिल्ह्यातून पहिल्या महिला केंद्रीय मंत्री होण्याचा मान खासदार रक्षा खडसे यांना मिळालाय.
सरपंच पदापासून राजकीय कारकिर्दीची सुरूवात –
माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडून रक्षा खडसे यांना राजकीय पार्श्वभूमी लाभली. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात सरपंच पदापासून सुरू झाली. तसेच त्यांचा राजकारणातला आलेख हा नेहमीच चढत्या क्रमाने राहिलाय. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी सरपंच, जिल्हा परिषद सदस्या, खासदार अशा पदावर काम केले आहे. तसेच त्यांना आता मंत्री पदाची संधी मिळाल्यामुळे केंद्रीय मंत्री पदावर त्यांना काम करावे लागणार आहे. दरम्यान, त्यांच्या शपथविधीनंतर त्यांना कोणते खाते मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : मोठी बातमी! खान्देशातून रक्षा खडसेंना संधी, आज घेणार एनडीए सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ