मुंबई, 14 फेब्रुवारी : नवी दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शरद पवारांच्या हस्ते नुकताच ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केल्यावरून काल ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मला पुरस्कार मिळण्यावर विरोधकांचा आक्षेप का? असा सवाल करत जोरदार हल्लाबोल केला होता. दरम्यान, आता संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा पलटवार केलाय.
संजय राऊत काय म्हणाले? –
खासदार संजय राऊत आज माध्यमांसोबत संवाद साधताना म्हणाले की, मोदी-शहांनी त्यांना भारतरत्न अथवा परमवीर चक्र पुरस्कार द्यावा. माझा आक्षेप एवढाच आहे की, महादजी शिंदे हे एक योद्धा होते. जे दिल्लीपुढे कधी झुकले नाहीत. आणि एखाद्या खासगी संस्थेच्यावतीने त्यांचा नावाचा पुरस्कार एकनाथ शिंदे यांना देणे म्हणजे स्वाभामिनाचा आणि शौर्य अपमान आहे. तसेच शरद पवारांनी तिथे जाणे हे त्यांच्या पक्षातील लोकांसह महाराष्ट्रातील जनतेने रूचलेले नाही. दरम्यान, दिल्लीपुढे झुकलेल्या-वाकलेल्यांना अथवा गद्दारांना तुम्ही हा पुरस्कार देताय, हाच आमचा मुद्दा असल्याचे संजय राऊतांनी स्पष्ठ केले. एकनाथ शिंदे हे एकेकाळचे माझे अत्यंत घनिष्ठ मित्र आणि सहकारी होते. यामुळे त्यांनी मला शहाणपण शिकवू नये. जे सरकार भ्रष्टाचार आणि गद्दारीतून निर्माण झाले, त्या सरकारचे ते प्रमुख होते. संपुर्ण यंत्रणा विकत घेऊन त्यांनी त्यांचं सरकार टिकवल. त्यांनी निवडणुका प्रामाणिकपणे जिंकलेल्या नसून केवळ पैशांच्या जोरावर या निवडणुका जिंकल्या, असा आरोप एकनाथ शिंदे यांच्यावर संजय राऊतांनी केलाय.
राजन साळवींच्या पक्षप्रवेशावर राऊतांची प्रतिक्रिया –
राजन साळवींच्या शिवसेना पक्षप्रवेशावर बोलताना राऊत म्हणाले की, पक्षाने त्यांना तीन वेळा आमदार केले. मात्र, सत्ता गेल्यावर जो माणूस तडफडत राहतो, याला आम्ही शिवसैनिक म्हणत नाही. साळवी स्वतःला कडवट शिवसैनिक समजत होते. मात्र, बाळासाहेब अनेक काळ सत्तेशिवाय राहिले आणि आम्ही त्यांच्याबरोबर अनेक काळ सत्तेशिवाय राहिले. खरंतर, सत्ता आम्हाला फार उशीराने मिळाली. तरीदेखील आम्ही बाळासाहेबांसोबत एकनिष्ठ राहिलो आणि राहू. कारण, सत्ता हे सर्वस्व नाही. हे जे राजन साळवींसारखे आहेत. दरम्यान, संकटकाळात तुम्ही पक्षातील नेत्यांसोबत-पक्षासोबत राहिले पाहिजे. तुमचे जे काही मतभेद आहेत ते दूर करता आले असते. मात्र, पक्षातून जाण्याची काहीही कारण देत आहेत. खरंतर, राजन साळवी ह्या नावाला ओळख शिवसेनेने दिली. तुम्हाला जर पक्षाने नगराध्यक्ष तसेच आमदारकी दिली नसती तर तुम्ही कोण होतात, असा सवालही राऊतांनी साळवींना केलाय.
हेही पाहा : IPS Dr. Maheshwar Reddy: सोशल मीडिया, क्राइम, तरुणाई; Jalgaon SP डॉ. महेश्वर रेड्डींची विशेष मुलाखत