जळगाव : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची लालपरी ही महाराष्ट्राची लाईफलाईन मानली जाते. तसेच सर्वसामान्य प्रवाशांच्या हक्काचे साधन म्हणूनही त्याकडे पाहिले जाते. मात्र, याच लालपरीची 15 टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांच्या किती पैसे ज्यादा द्यावे लागणार आहे, हे जाणून घेऊयात.
गेल्या काही महिन्यात प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. यामध्ये महिलांना महिला सन्मान योजनेंतर्गत 50 टक्के भाडे मोफत करण्यात आले आहे. यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नात चांगलीच वाढ झाली. मात्र, दुसरीकडे इंधनाचे दर वाढत असल्याने एसटी महामंडळाच्या वतीने 14.97 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ही दरवाढ शुक्रवार मध्यरात्रीपासून करण्यात आली.
2021 पासून एसटी तिकीट प्रवासात पहिल्यांदाच कोणत्याही प्रकारची भाडेवाढ करण्यात आली आहे. इंधनाचे दर वाढत असल्याने एसटीवर जवळपास 3 कोटी रुपयांचा बोझा पडत आहे. त्यामुळे यावर मार्ग काढण्यासाठी दरवाढ करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
या प्रवाशांना बसणार फटका –
एसटी प्रवास महागल्यानंतर इतर खासगी वाहतूकदारही भाडेवाढ करतात. त्यामुळे सध्या राज्यात महिलांना एसटी प्रवास 50 टक्के मोफत, तसेच वृद्धांना मोफत आहे. मात्र, इतर प्रवाशांना दरवाढीचा फटका बसणार आहे. त्यामुळे इतरांना दिल्या जाणाऱ्या सवलवतीचा खर्च सामान्या नागरिकांकडून वसूल केला जात असल्याची संतप्त भावनाही प्रवाशी व्यक्त करत आहेत.