चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव : विद्यार्थ्यांचं लक्ष शाळेकडे केंद्रित करण्यासाठी, पुढची पिढी घडवायची असेल तर त्यासाठी शिक्षणात काय बदल केले पाहिजेत, हे शिक्षकांनी सुचवा. शिक्षकांच्या अनेक संघटना आहेत, त्या संघटनांच्या माध्यमातून शाळेला कळवा. शिक्षकांसाठी काय गेलं पाहिजे, शिक्षकांनाही ज्ञान मिळालं पाहिजे, त्यासाठी काय गेलं पाहिजे, कुठले प्रशिक्षण दिले गेले पाहिजे, हे शिक्षक संघटनेने सुचवावं, असे आवाहन राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी आज केलं.
‘मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा’ स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुक्यातील जि. प. मराठी शाळा, होळ या शाळेने प्रथम क्रमांक पटकाविला. तर द्वितीय क्रमांक जि.प. मराठी शाळा, कढोली तर तृतीय क्रमांक जि.प. प्राथमिक शाळा, सावरखेडे (ता. पारोळा) या शाळेने पटकाविला आहे. तर माध्यमिक खासगी गटातून प्रथम आलेल्या कै. यादव दगडू पाटील माध्यमिक विद्यालय, तांदुळवाडी यांना ११ लाख रुपये व स्मृतिचिन्ह, सारजाई कुडे माध्यमिक शाळा, धरणगाव यांना ५ लाख व स्मृतिचिन्ह, तृतीय क्रमांकावरील जनता हायस्कूल, नेरीला ३ लाख रुपये व स्मृतिचिन्ह असे बक्षीस आहे, जाहीर करण्यात आला होता. हा पारितोषिक वितरण सोहळा आज ४ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनात करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी मंत्री संजय सावकारे हे म्हणाले की, शिक्षकांनी दिलेली शिक्षा मानणारे आजची पिढी आम्ही आहोत. शिक्षकांचा अजुनही तोच मानसन्मान आमच्याजवळ आहे. जेवढा मान आज आमदार, मंत्री यांना नसेल तितका आजही शिक्षकांना समाजात मान आहे. त्याचं कारण असं की पिढी घडवण्याचं काम शिक्षक करतात. आता मंत्रीही घडवायचा असेल तर तुम्हालाच घडवायचा आहे. मंत्र्यावर, आमदारावर काय संस्कार टाकायचे, हे तुम्ही ठरवायचं आहे.
हेही पाहा – JMFC Results : शेतकरी कुटुंबातील ऋषिकेश बनला पाचोरा तालुक्यातील पहिला न्यायाधीश | Success Story
पूर्वी एकत्र कुटूंब असायचं. मुलं काय करतात, ते आई वडिलांना माहितीही नसायचं. आम्ही बालपणी असताना कुणीही कुठेही जायचं, कुणाच्या घरात काही कुणाला मनाई नव्हती. तशी व्यवस्था होती. सर्वांच्या मुलांवर सर्वांचं नियंत्रण होतं. आता बाजूचे काका जरी आले तरी काय करेल तो… असं म्हणत त्या काकाचंही सांगतील की तो दुसऱ्या काकूसोबत फिरत होता. म्हणून काकाही चूप पुतण्याही चूप. संस्कृती सर्व बदलत चालली आहे. शिक्षणाची पद्धत बदलली. डिजिटलायजेशन होत आहे.
मी एक शिक्षिकेचा मुलगा आहे. माझी आई शिक्षिका होती. त्यामुळे शिक्षकांचे प्रश्न, व्यथा काय असतात, हे सर्व मला माहिती आहे. जिल्ह्यातील बऱ्याचशा शाळा आता इतक्या सुधारत आहेत की इंग्रजी शाळांमध्ये जाणारी मुलं आता जिल्हा परिषदेच्या शाळेत येऊ लागली आहेत, हे सर्व श्रेय शिक्षकांचं आहे. पाचोरा तालुक्यातील होळ येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी रांगा लागतात. प्रवेश मिळत नाही, अशी परिस्थिती जिल्हा परिषदेच्या शाळेची आहे. इतकी जिल्हा परिषदेची परिस्थिती बदलली आहे.
विद्यार्थ्यांचं लक्ष शाळेकडे केंद्रित करण्यासाठी, पुढची पिढी घडवायची असेल तर त्यासाठी शिक्षणात काय बदल केले पाहिजेत, हे शिक्षकांनी सुचवा. शिक्षकांच्या अनेक संघटना आहेत, त्या संघटनांच्या माध्यमातून शाळेला कळवा. शिक्षकांसाठी काय गेलं पाहिजे, शिक्षकांनाही ज्ञान मिळालं पाहिजे, त्यासाठी काय गेलं पाहिजे, कुठले प्रशिक्षण दिले गेले पाहिजे, हे शिक्षक संघटनेने सुचवावं, तर माझी शाळा ही सुंदर शाळा होईल. नाहीतर फक्त रंगरंगोटी केली, चांगले बक्षिसं मिळाले आणि झालं. असं होणार नाही तर त्या शाळेत चांगले विद्यार्थी घडले पाहिजेत. आतापर्यंत शाळेत चांगले इंजीनिअर, चांगले कलेक्टर, मोठमोठे अधिकारी घडत होते. आता फक्त पुढारी घडवू नका, बाकीचेही लोकं घडवा, असाही सल्ला मंत्री संजय सावकारेंनी उपस्थित शिक्षकांना दिला.
या कार्यक्रमाला पाचोरा-भडगावचे आमदार किशोर आप्पा पाटील, जळगाव महानगर पालिकेच्या माजी महापौर सीमा भोळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक नखाते, मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाबुलाल पाटील, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कल्पना चव्हाण, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विकास पाटील, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेतील पुरस्कार विजेत्या शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका, आदी उपस्थित होते.