जळगाव : मुक्ताईनगरमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची मुलगी आणि तिच्या मैत्रिणीसोबत छेडछाड केल्याची घटना समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. मात्र, अद्यापही 3 आरोपींना अटक झालेली नाही. यावरुन माजी मंत्री आणि विधानपरिषदेचे विद्यमान आमदार एकनाथ खडसेंनी याप्रकरणी पोलिसांवर जोरदार निशाणा साधला.
काय म्हणाले एकनाथ खडसे –
माध्यमांशी बोलतना विधानपरिषदेचे आमदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे म्हणाले की, राज्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर आहे. पोलिसांचा धाक राहिला नाही. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडखानीच्या घटनेला 10 दिवस पूर्ण झाले आहेत. अजूनही आरोपींना पकडण्यात पोलिसांना पूर्णपणे यश आलेले नाही. इतक्या महत्त्वाच्या राजकीय व्यक्तीच्या घरी ही घटना घडली असतानासुद्धा जर पोलीस अशा स्वरुपाचे दुर्लक्ष करत असतील, तर हे दुर्दैवी आहे. पोलिसांनी तातडीने आरोपींना अटक करावी. ते अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न करत आहेत, याचा अर्थ ते इथे जवळपास आहेत. इथल्या आका जे राजकीय व्यक्ती आहेत, त्यांच्या संरक्षणाखाली ते आहेत, असा माझा संशय आहे. त्यामुळे पोलीस त्यांना पकडण्यास धजावत नाहीत, असे एकनाथ खडसे म्हणाले आहेत.
आरोपींना कठोर शासन करावे –
मंत्री असो की आमदार असो कुणाच्याही मुलीच्या बाबतीत अशा घटना घडत असतील तर त्या गंभीर आहेत. कुठेही असा प्रकार घडला तर पोलिसांनी तातडीने कार्यवाही करावी आणि आरोपींना कठोर शासन करावे, अशी मागणीही त्यांनी केली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत विधानसभा निवडणुकीत पुन्हा विजय मिळाल्यावर लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रति महिना देण्यात येईल. मात्र, महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाल्यावर अद्यापही लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता देण्यात आलेला नाही. याबाबत बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, निवडणुकीच्या पूर्वी यांनी आश्वासने दिली आणि त्यांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात 1500 रुपयेच मिळाले. आता 2100 रुपये देण्याचे सांगितलेच नव्हते, यापद्धतीने टाळाटाळ करत आहेत. राज्यावर 8 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. राज्याची तूट ही 40 हजार पर्यंत गेलेली आहे. आता ही तूट भरुन काढायची असेल तर 10 वर्षे लागतील. कारण इतक्या मोठ्या प्रमाणात कर आता एका वर्षात सरकार लावू शकत नाही. 46 हजार कोटी रुपये तुम्ही लाडक्या बहिणींसाठी वापरता, पण हा पैसा कुठून भरुन काढायचा. या सरकारने अनेक कंत्राटदारांचे पैसे दिलेले नाहीत. म्हणून ते संपावर आहेत. या सरकारची अशी परिस्थिती आहे की, या सरकारला पुढच्या दोन महिन्यात शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार देणेही शक्य होणार नाही, असा दावाही एकनाथ खडसेंनी केला.
बुलढाणा जिल्ह्यातील राज्य सरकारचा युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याने आत्महत्या केल्याच्या घटनेवर बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, आम्ही वैनगंगापासून नळगंगापर्यंत पाणी आणू वैगेरे अशा घोषणा गेल्या 10 वर्षात महाराष्ट्रातील सरकार करत आहे. पण प्रत्यक्ष याठिकाणी पाणी मिळत नाही म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने माझ्या शेतीला पाणी पाहिजे असा टाहो फोडत आत्महत्या केली, हे सरकारच्या दृष्टीने लांछनास्पद आहे. सरकारने याबाबत चौकशी केली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळेल, अशा दृष्टीने पाऊले उचलली पाहिजेत.
हेही वाचा – farmer suicide : महाराष्ट्र शासनाचा युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये काय लिहिले?