जळगाव, 28 जुलै : गेल्या काही दिवसात जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. जळगाव जिल्ह्यात मागील काही महिन्यांमध्ये खुनाच्या घटना घडत असल्याचे दिसत आहे. मागच्याच महिन्यात पाचोरा तालुक्यात बसस्थानक परिसरात एका तरुणाचा खून झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता जळगाव जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
जळगावात जुन्या वादातून एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. धीरज दत्ता हिवराळे (27, रा. सम्राट कॉलनी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. जुन्या वादातून धारदार शस्त्र घेऊन दोन जण एकमेकांवर भिडले व यात धीरज दत्ता हिवराळे या तरुणाचा मृत्यू झाला. तसेच कल्पेश वसंत चौधरी (25, रा. सम्राट कॉलनी) हा गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
खुनाची ही घटना रविवारी दुपारी साडेतीन वाजता जोशी कॉलनीत घडली. या घटनेनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दोघांच्या कुटुंबीयांनी मोठी गर्दी केल्याने तणावाचे वातावरण होते.
काय आहे संपूर्ण घटना –
सम्राट कॉलनीतील रहिवासी असलेला धीरज हिवराळे हा फुले मार्केटमध्ये कामाला होता. तो व त्याच्या घराजवळ राहणाऱ्या कल्पेश चौधरीमध्ये वाद झाला होता. तेव्हापासून दोघांमध्ये धुसफुस असायची. याचदरम्यान, काल रविवारी दुपारच्या सुमारास पुन्हा वाद झाला. त्या वादातून दोघांनी एकमेकांवर चॉपरसारख्या धारदार शस्त्राने वार केले. या घटनेत धीरज हिवराळे या तरुणाचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी नाना तायडे, किरण पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, पोलिस निरीक्षक बबन आव्हाड हेदेखील रुग्णालयात पोहोचले. दरम्यान, या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.