चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
मुंबई, 28 मे : राज्यात पुणे अपघात प्रकरण चांगलेच गाजत असून यामध्ये रोजच नवनवीन घडामोडी घडत आहेत. या अपघात प्रकरणात आतापर्यंत अनेक जणांना अटक करण्यात आली असताना गृहमंत्र्यांनी याप्रकरणाची जबाबदारी स्विकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. तसेच पुणे अपघात प्रकरणावरुन पटोले यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
काय म्हणाले नाना पटोले? –
मुंबईत पत्रकार परिषदेत संवाद साधताना नाना पटोले म्हणाले की, ललित पाटील प्रकरणात ससून कशाप्रकारे ड्रग्ज माफियांसाठी हॉटेल बनले आहे, हे समोर आले होते. त्यानंतर आता या अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल बदलण्यात आल्याचे प्रकरण घडले आहे. नागपूरमध्ये अशीच घटना घडली. नशेच्या अंमलाखाली दोन मुलींनी दोघांना उडवले. मात्र, त्यादेखील सुटल्या.
राजीनामा द्यावा –
जळगावातील रामदेववाडीत अशाच एका घटनेत आरोपी 10 तासांमध्ये सुटला. दरम्यान, या अपघातातील हे सर्व आरोपी श्रीमंत घरातील होते. पुण्यातील डॉ. तावरे प्रकरणात काही मंत्र्यांचीही नावे समोर येताना दिसत होते. म्हणून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याची जबाबदारी स्विकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.
अपघातात आणखी एकाचा समावेश? –
पुण्यातील कल्याणीनगर परिसरात ज्या रात्री पोर्शे कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. दरम्यान, त्यावेळी गाडीतून दोन व्यक्ती उतरल्या होत्या. तो दुसरा मुलगा कोणाचा होता?, ह्याचा शोध घेतला पाहिजे, असे नाना पटोले म्हणाले. दरम्यान, पटोले यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या अपघातावेळी पोर्शे कारमध्ये खरोखरच आणखी एका बड्या व्यक्तीचा मुलगा होता का, याविषयीच्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
हेही वाचा : “देशाला फूलटाईम कृषी मंत्री नाही, अन् कृषीप्रधान देश म्हटला जातो”, उन्मेश पाटील यांची सरकारवर टीका