नवी दिल्ली : खान्देशातील नंदुरबारच्या खासदार डॉ. हिना गावीत यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत स्नेहभोजनाचा मान मिळाला आहे. काल 9 फेब्रुवारी 2024 संसदेच्या शेवटच्या अधिवेशनामध्ये सर्वपक्षीय खासदारांना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनातील कॅन्टीनमध्ये खासदारांसोबत स्नेहभोजन केले. यावेळी विविध पक्षांच्या खासदारांना यासाठी आज सकाळी आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या खान्देशातील नंदुरबारच्या खासदार डॉ. हिना गावित यादेखील होत्या.
संसदेचं हे शेवटचं अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. या अधिवेशनानंतर लोकसभा निवडणुकीची घोषणा होईल आणि नवीन सरकार एप्रिलच्या निवडणुकीनंतर स्थापन होईल. त्यावेळी अनेक नवीन खासदार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने निर्णय घेण्यात आला की, आज संसदेच्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता पण श्वेतपत्रिकेसाठी एक दिवसाचा कालावधी लोकसभा आणि राज्यसभेचा वाढविण्यात आला. त्यामुळे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनातील कॅन्टीनमध्ये दुपारी सर्वपक्षीय खासदारांसोबत स्नेहभोजन केले. या स्नेहभोजनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांसोबत औपचारिक गप्पादेखील मारल्या.
नंदुरबारच्या खासदार डॉ. हीना गावित या काय म्हणाल्या?
आज पहिल्यांदाच आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्यासोबत भोजन करण्याचा योग आला. संसदेचं आजचं पहिलं सत्र संपल्यानंतर मोदीजींनी आम्हा काही खासदारांना भोजनाला येण्याची सूचना दिली. आमच्यासाठी तर हा सुवर्णयोगच होता. केवळ आमच्याच नाही तर काँग्रेस, बिजू जनता दल, अशा वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांना आमंत्रित केले होतं. यावेळी विविध विषयांवर चर्चा करतानाच आमच्या कामाची माहितीही त्यांना इत्यंभूत आहे, हे मला सतत जाणवलं. अतिशय बारीक बारीक गोष्टींची माहिती ते कशी ठेवतात, इतक्या कामाच्या व्यापात या गोष्टी कशा लक्षात ठेवतात याविषयी मला कायमच कुतूहल वाटतं. यावेळी खूप विषयांवर अनौपचारिक, अगदी नॉन पॉलिटिकलही गप्पा झाल्या.
आदिवासींची आस्थेने चौकशी –
नंदुरबारबद्दल आस्थेने चौकशी करत, मिलेट पिकवणारे सगळ्यात जास्त आदिवासी आहेत ना, असंही त्यांनी विचारलं, तेव्हा माझ्या भागातल्या आदिवासी महिला आता मिलेटच्या कुकीज बनवतात, हे सांगितल्यावर त्यांना आनंद झाला. एकूणच आजचा दिवस माझ्यासाठी खूपच खास आहे. आदरणीय मोदीजींबरोबर मी गेली दहा वर्षे काम करते आहे त्यांचा आदर्श आम्हा सर्व खासदारांच्या समोर कायमच असतो. त्यांच्या इतकी अफाट कार्यक्षमता नसली तरीही त्यांच्या पाऊलखुणांवर पाऊल ठेवून काम करण्याचा मी नेहमीच प्रयत्न करते. मोदींजींच्या सोबतचं आजच जेवण केवळ अविस्मरणीय आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
जेवणात होते हे पदार्थ –
नवीन संसद भवनात राज्यसभेसाठी वेगळी कॅन्टीन तर लोकसभेसाठी वेगळी कॅन्टीन आहे. ही कॅन्टीन रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून संचालित करण्यात येते. गेल्यावेळी जुन्या संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांसोबत खिचडीचा आस्वाद घेतला होता. मात्र, यावेळी पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनातील कॅन्टीनमध्ये शाकाहारी थाळीचे जेवण घेतले. या शाकाहारी थाळीमध्ये पोळी, वाटाण्याची भाजी, डाळ, भात, बुंदीचा रायता, गुलाब जामुन हे पदार्थ होते.