अमरावती – विधानसभा निवडणुकीनंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएमवर आक्षेप घेतला जात आहे. तसेच बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचीही मागणी केली जात आहे. यातच आता अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीचे विद्यमान खासदार बळवंत वानखेडे यांना आव्हान दिले आहे.
अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनी राजीनामा द्यावा आणि बॅलेट पेपरवर निवडणूक लढवावी, असे आव्हान नवनीत राणा यांनी बळवंत वानखेडे यांना दिले आहे. त्यावर खासदार बळवंत वानखेडेंनीही नवनीत राणा यांच्यासमोर एक अट ठेवत त्यांचे आव्हान स्विकारले आहे.
काय म्हणाल्या होत्या नवनीत राणा –
महाविकास आघाडीला ईव्हीएमवर जे आक्षेप आहे, त्यांना माझे आव्हान आहे की, अमरावती जिल्ह्याचे खासदार त्यांनी राजीनामा द्यावा आणि रवी राणा हेसुद्धा आपल्या आमदारकीचा राजीनामा देतील आणि ती निवडणुकाही बॅलेटवर करा. दोन्ही निवडणुका बॅलेटवर करा, असे आव्हान माजी खासदार नवनीत राणा यांनी केले.
खासदार बळवंत वानखेडेंनीही दिले प्रत्युत्तर –
‘भारतीय जनता पक्षाच्या विश्वनेत्या, राष्ट्रीय नेत्या आदरणीय नवनीतजी राणा यांनी मी राजीनामा द्यावा आणि बॅलट पेपरवर निवडणूक लढवून दाखवा, हे त्यांनी दिलेले चॅलेंज मी स्विकारत आहे. त्यांनी नम्र विनंती आहे की, त्यांनी मला जे आव्हान केले आहे, त्याबाबत निवडणूक आयोगाकडून तसं मला लेखी पत्र द्यावं की येणारी लोकसभेची पोटनिवडणूक ही बॅलेट पेपरवर घेण्यात येईल. मी त्यांचं आव्हान स्विकारलं असून केव्हाही मी राजीनामा देण्यास तयार आहे. फक्त त्यांनी निवडणूक आयोगाकडून बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊ, असे लेखी पत्र द्यावे’, असे म्हणत खासदार बळवंत वानखेडे यांनी नवनीत राणा यांचे चॅलेंज स्विकारले आहे.
गुलाबराव देवकरांच्या प्रवेशाला अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध; वाचा, सविस्तर बातमी…