मुंबई : विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख आहे. 5 जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीसाठी भाजपने कालच आपल्या 3 उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. यानंतर आज सकाळी शिवसेनेकडून आपल्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यामध्ये अखेर आता राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला असून अजितदादांकडून संजय खोडकेंना संधी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादीकडे आले 100 पेक्षा जास्त विनंती अर्ज –
विधानपरिषदेच्या पाच जागांपैकी 3 जागा या भाजपच्या वाट्याला आल्या असून प्रत्येकी 1 जागा ही अनुक्रमे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आली आहे. यामध्ये राष्ट्रवादीकडे एका जागेसाठी तब्बल 100 पेक्षा जास्त विनंती अर्ज आले होते. यामध्ये विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विधानपरिषदेवर आपल्याला संधी मिळावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री दिवंगत बाबा सिद्दीकी यांचे पूत्र झिशान सिद्दीकी हे इच्छूक होते. त्यांच्याकडूनही या जागेसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, संग्राम कोते पाटील यांच्यासह अनेक इच्छुकांनी या जागेसाठी विनंती केली आहे. मात्र, अखेर यामध्ये संजय खोडके यांना संधी देण्यात आली आहे. संजय खोडके हे विदर्भातील मोठे नेते मानले जातात. त्यांच्या पत्नी सुलभा खोडके यासुद्धा अमरावतीच्या आमदार आहेत.
महायुतीच्या 5 उमेदवारांची यादी –
भाजप – संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे
शिवसेना – चंद्रकांत रघुवंशी
राष्ट्रवादी काँग्रेस – संजय खोडके
असा आहे विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम
अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत – 17 मार्च
अर्जाची छाननी – 18 मार्च
अर्ज मागे घेण्याची मुदत – 20 मार्च
मतदान – 27 मार्च (सकाळी 9 ते दुपारी 4)
मतमोजणी – 27 मार्च सायंकाळी 5 वाजल्यानतंर
हेही वाचा – Success Story : बालपणी आई-वडिलांचं निधन, मामांकडे पुर्ण केलं शिक्षण अन् आता झाला क्लास-2 ऑफिसर
हेही वाचा – अखेर ठरलं!, एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला, शिवसेनेकडून खान्देशातील ‘या’ नेत्याला मिळाली मोठी संधी