जळगाव, 5 सप्टेंबर : आज देशात मोदी साहेबाचं राज्य आहे. पण मोदी साहेबांनी मागील 9 वर्षांत फोडाफोडीचे राजकारण ही एकच गोष्ट केली. शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, फोडाफोडीचं राजकारण, एवढं एकच गोष्ट त्यांनी केली, या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्वाभिमान सभेत जळगाव येथे ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर टीका करत, शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच खान्देशातील आठवणांनी उजाळा दिला.
आपल्या भाषणात शरद पवार काय म्हणाले?
आज बऱ्याच दिवसांनी तुम्हा सगळ्यांच्या समोर कार्यक्रमाच्या निमित्ताने आज बोलायची संधी मिळाली. यापूर्वी अनेकदा आलो, महाराष्ट्राचा इतिहास आज जर बघितला तर खान्देशचा इतिहास हा राज्याच्या इतिसाहात अभिमानाचा आहे. इथे आल्यावर बहिणाबाईंचं, साने गुरुजी, रानकवी ना. धो. महानोरांचं स्मरण होतं. या सर्व सगळ्या सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वांनी खान्देशचा इतिहास हा समृद्ध करण्यासाठी मोलाची कामगिरी केली. भाषणं चालू असताना फैजपूर काँग्रेसच्या अधिवेशनाचा उल्लेख झाला. देशाच्या स्वातंत्र्याच्या आधी काँग्रेसची अधिवेशने अनेक ठिकाणी झाली. पण देशातील पहिलं ग्रामीण भागातील अधिवेशन हे फैजपूरला, खान्देशात झालं. यावेळी साक्षात महात्मा गांधी हजर होते. जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद साहेब हजर होते.
माझं भाग्य असंय की, एकेकाळी जळगाव मला जिल्ह्यात संघटनेत काम करण्याची संधी मिळाली. मला आठवतंय, माधवराव बापू पाटील, प्रतिभाताई पाटील, के.एम. बापू पाटील, मुरलीधर आण्णा पवार या सर्वांसोबत मला काम करण्याची मला मिळाली आणि तो खान्देश आज या राज्याचे चित्र बदलायला अग्रभागी असेल. संकटं आहेत. एकेकाळी सर्व देशात, देशाबाहेर उत्तम दर्जाची केळी ही खान्देशातून, जळगावातून जात होती. एक काळ असा होता, उत्तम शेतीचा आदर्श याठिकाणी पाहायला मिळत होता. आज दुष्काळाचं संकट आहे. शेतकरी अडचणीत आहे. पाणी नाही. धरणामध्ये पाणी नाही. पिकं दुहेरी पेरणी केली तरी पिकं पडली आणि येतील की नाही, याची खात्री नाही.
संबंध देशाला कापूस देणारा हा जिल्हा, इथली कपाशी आज संकटात जाते की काय असं चित्र आहे. म्हणून हे चित्र बदलायचं. माझी खात्री आहे, परिस्थिती बदलेल. पण आज ज्या भाजपच्या हातात महाराष्ट्र, देशाशी सूत्रे आहेत, त्यांना शेतकऱ्यांच्या दु:खाबद्दल आस्था नाही. जनावरांना पाणी नाही, त्याची चिंता नाही. याचा अर्थ असा आहे, चुकीच्या लोकांच्या हातामध्ये, देशाचं राज्य गेलं आहे.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, एकनाथ खडसे, जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, अरुणभाई गुजराथी, गुलाबराव देवकर यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते.
1985 मधील जळगावची ती आठवण –
आज आपण बघतोय की, बेरोजगारी, महागाई, वाढतेय. यवतमाळ जिल्ह्यात 15 दिवसात 20 लोकांनी आत्महत्या केल्या. शेतकरी घाम गाळणारा, कष्ट करणारा, तो आत्महत्या करण्यासाठी रस्त्यावर जातो, याचा अर्थ त्याच्या प्रश्न आज सोडवला जात नाही. म्हणून आज या सामूहिक शक्ती उभी करावी लागेल. मला आठवतंय,1985 मध्ये अशी परिस्थिती होती, त्यावेळी आम्ही जळगावमध्ये बसून असा निर्णय घेतला की, नागपूरला विधानसभेचे अधिवेशन होते, तिथं जायचं, चालत जायचं आणि जळगाव ते नागपूर दिंडी काढली, सुरुवातीला 10 हजार लोक होते, दुसऱ्या दिवशी 25, तिसऱ्या दिवशी 50 हजार, आणि चौथ्या दिवशी अकोल्याला 1 लाख झाले आणि नंतरच्या दिवशी अमरावतीला दीड लाखाच्या वर लोक जमले आणि शेवटी काही लाख लोक या नागपूरच्या शहरात जाऊन या दिंडीने इतिहास केला.
शेतकऱ्यांची जबरदस्त शक्ती या जगाला दाखवली आणि म्हणून हा भाग आणि इथला शेतकरी, हा लाचार नाही, हा भेकड नाही. हा भिक नाही मागत तर आपल्या कष्टाची किंमत मागतो आणि जर किंमत देत नसतील तर संघर्ष करतो आणि संघर्षाचा इतिहास खान्देशने दाखवला आहे, ही बाब आपल्याला मान्य करावी लागेल.
मोदी साहेबांनी 9 वर्षात फोडाफोडीचं राजकारण केलं –
आज काय चित्र दिसतंय, मोदी साहेबांचं राज्य आहे, मोदी साहेबांनी काय केलं, 9 वर्षे झाली, इतर राजकीय पक्ष फोडणे, शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, फोडाफोडीचं राजकारण, एवढं एकच गोष्ट त्यांनी केली आणि आपल्या हातातील सत्ता लोकांसाठी वापरण्याऐवजी सीबीआय, ईडी, ज्याचा उल्लेख याठिकाणी अनिल देशमुखांनी केला. काहीही संबंध नसताना काही महिने अशा एका महत्त्वाच्या सहकाऱ्याला तुरुंगात टाकायंचं काम केलं. नवाब मलिक जुना नेता, आज अनेक महिने त्यांना तुरुंगात टाकलं. अनेकांना तुरुंगात टाकलं. लोकांनी दिलेली सत्ता ही लोकांना सन्मानानं जगता कशी येईल, यासाठी वापराऐवजी आज त्याठिकाणी त्या सत्तेचा गैरवापर हा भाजपवाल्यांनी केला. अनेकांबाबत सांगता येतील.
माहिती खोटी ठरली तर काय सजा घेणार –
आज देशाचे पंतप्रधान हे भोपाळला गेले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. इथे भ्रष्ट लोकं आहेत. अनेकांची माहिती आमच्याकडे आहेत. माझी मोदी साहेबांना नम्रतेनं एकच सांगणं आहे, जर याठिकाणी कुणी चुकीचं काम केलं असेल तर त्यांच्याविरोधात खटला भरा, चौकशी करा, आणि खोटं ठरलं तर त्याची सजा तुम्ही काय घेणार हे देशाला सांगा. खोटं आरोप करणं ही गोष्ट काही अपेक्षित नाही. म्हणून अनेक गोष्टी सांगता येतील, ज्याचा उल्लेख जयंतरावांनी केला. दोन दिवसांपूर्वी आम्ही जालन्याला गेलो. काय त्याठिकाणी साध्या मागण्या होत्या. उपोषण करणाऱ्यांवर काही कारण नसनाना पोलिसांनी लाठीहल्ला केला. अनेक लोकं जखमी झालं, लहान बालकं जखमी झालीत आणि त्याचा परिणाम म्हणून आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आंदोलनं सुरू झालीत. सत्तेचा गैरवापर करुन, शेतकऱ्यांवर, शेतमजुरांवर, आया बहिणींवर लाठीहल्ला करण्याची निती ज्यांची असेल त्यांच्या हातात आम्ही सत्ता ठेवणार नाही. संधी मिळेल तेव्हा त्यांचा 100 टक्के पराभव करू हा निकाल तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यासाठी आपण तयार झालो पाहिजे, असे आवाहन यावेळी त्यांनी जनतेला केले. जे बदल महाराष्ट्रात करायचे आहेत, त्याला साथ दिली, त्याबद्दल धन्यवाद देतो, असेही ते म्हणाले.