जळगाव, 12 डिसेंबर : जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीचा काल रविवारी निकाल लागला. या निवडणुकीत एकनाथ खडसेंना मोठा धक्का बसला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर जोरदार टीका केली. तसेच खडसेंनीही त्याला प्रत्युत्तर दिले होते. आता या निवडणुकीच्या निकालानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
गुलाबराव पाटील यांची खडसेंवर जोरदार टीका –
जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अखेर या निवडणुकीमध्ये एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांचा पराभव झाला. यानंतर गुलाबराव पाटील हे खडसेवर निशाणा साधत म्हणाले की, एकनाथ खडसे तुम्ही राष्ट्रवादी संपवायला निघाला आहात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी तुम्हाला दिलेली विधान परिषदेची आमदारकी पण परत घ्यावी, या शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसेंवर जोरदार प्रहार केला.
एकनाथ खडसेंनेही दिले प्रत्युत्तर –
तर मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या टिकेनंतर एकनाथ खडसेंनेही त्यांना प्रत्यत्तर दिले आहे. ते म्हणाले की, गुलाबराव पाटील यांनी मला विधान परिषदेची आमदारकी दिलेली नाही. एखाद्या चिन्हावर जेव्हा निवडणूक होईल त्यावेळी खऱ्या अर्थाने बलाबल कळेल. तसेच गुलाबराव पाटील हे मंत्री असताना एकतरी ग्रामपंचायत ही शिवसेनेची का नाही, असा सवालही त्यांनी केला.