नवी दिल्ली – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. काल दिल्लीत महाराष्ट्र सदनात अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिंदे यांना हा पुरस्कार माजी केंद्रीयमंत्री तसेच साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. दरम्यान, एकनाथ शिंदे यांना शरद पवारांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आल्यानंतर शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर पहिल्यांदाच टीका केली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकर पाडलं, बेईमानी केली. त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी नाही यायला पाहिजे होतं. ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो, त्यांच्याबरोबर जे लोकं खुलेआम बसलेले आहेत, त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणं, हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणारे आहे. आम्हाला तुम्हाचे दिल्लीतील राजकारण जे काय आहे, हे आम्हाला माहिती नाही. पण पवारसाहेब, आम्हालाही राजकारण कळतं. आम्हाला सर्वांना या गोष्टींच्या वेदना झाल्या आहेत. शरद पवारांनी यावर खुलासा करायला हवा. अमित शहांनी उत्तर दिलं पाहिजे. देशद्रोहाची उत्तर असलेली लोकं. शिंदेंचा पक्ष हा अमित शहांचा पक्ष आहे. काल शरद पवार साहेबांनी शिंदेंचा सत्कार नाही तर अमित शहांचा सत्कार केला, असं मी मानतो. महाराष्ट्राच्या तुकडे पाडणाऱ्या, महाराष्ट्राचा उद्योग अमित शहांचा सत्कार, ते प्रतीक म्हणजे एकनाथ शिंदें यांचा सत्कार केला. तुमचं आणि अजित पवारांचे गुप्तगू होत असेल, हा तुमचा वैयक्तिक, कौटुंबिक प्रश्न असू शकतो. तरीही आम्ही अजित पवारांनी तुमचा पक्ष फोडला, कुटुंब फोडलं, याचं भान राखून आम्ही आमची पाऊलं टाकत असतो, या शब्दात खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.
खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, अशी टीका करणे दुर्दैवी आहे. उलट पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाची ही परंपरा आहे. त्या परंपरेनुसार, ही स्टेट्समनशिप जपलेली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे दिल्लीत होत आहे. पवार साहेब हे स्वागताध्यक्ष आहेत. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर हा कार्यक्रम होत असताना इतरांचाही सत्कार याठिकाणी झाला. राजकारणाच्या पलीकडे जाऊन याकडे पाहायला हवे. राऊत साहेबांना इतकं दु:ख झालं असेल तर मग उद्धवसाहेब यांनी अजित दादांची भेट घेतली. ही स्टेट्समनशिप जपलेली आहे. यामध्ये राजकारण आणलं तर अवघड होईल. पवारसाहेब यांच्या राजकारणाविषयी बोलण्याची उंची फार कमी जणांची आहे. राजकारणातला सुसंस्कृतपणा जपला पाहिजे.
शंभूराज देसाई काय म्हणाले?
तुम्ही पवार साहेबांबद्दल बोलत असाल तर बाजूला व्हा. महाविकास आघाडीतून बाहेर पडा. तुमची महाराष्ट्रात काय अवस्था होईल, ते पाहा. नुसतं तोंडाच्या वाफा काढत बसू नका, तसं करु दाखवा. तुमच्यात धाडस आहे का. पण ते करू शकणार नाही. केवळ बोलायचं आणि आपल्याकडे लक्ष केंद्रित करुन घ्यायचं, एवढा एककलमी कार्यक्रम संजय राऊतांचा आहे. बाकी काही नाही, अशी टिका शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी केली.
आमदार रोहित पवार काय म्हणाले?
दिल्लीतील कार्यक्रमावरून संजय राऊत साहेबांसारख्या मोठ्या राजकीय नेत्याने दिलेली प्रतिक्रिया आश्चर्यकारक आहे. महाराष्ट्राला स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सुसंस्कृत राजकारणाची परंपरा लाभली असून स्व. बाळासाहेब ठाकरे, आदरणीय पवार साहेब यांच्यासारख्या जेष्ठ नेत्यांनी ही परंपरा पुढे नेली, सामाजिक-सांकृतिक कार्यक्रमांना राजकीय मतभेदाचा कधीही अडसर ठरू दिला नाही तसेच महाराष्ट्राची सामाजिक व सांकृतिक वीण अधिक घट्ट करण्यावर नेहमीच भर दिला. पण मागील दोन-तीन वर्षात भाजपाने कलुषित केलेले राजकारण, महाराष्ट्राच्या अस्मितेशी केलेली छेडछाड बघता यामुळंच संजय राऊत साहेबांनी तडकाफडकी ही प्रतिक्रिया दिली असावी, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले.
सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
टिळक पुरस्कारासाठी मोदी पुण्यात आले होते. मणिपूरच्या मुद्द्यावरून सर्वपक्षीय लोक मोदींना विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. Modi Go Backचे नारे देत या विरोध प्रदर्शनामध्ये NCP(SP) सुध्धा सहभागी होती. पण त्याच पुरस्कार सोहळ्याला पवार साहेबांची उपस्थिती होती. मुळात पुरस्कार देण्याघेण्याचं गणित अत्यंत सोपं आहे. जे व्यवस्थेची भलावण करतात त्यांना व्यवस्था पुरस्कृत करते. जे व्यवस्थेची चिरफाड करतात त्यांना व्यवस्था बहिष्कृत ठरवते, असे सुषमा अंधारे यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले.
अमोल मिटकरी काय म्हणाले –
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, राऊत साहेबांना राजकारण शिकायला अजून अवधी आहे. पवार साहेबांनी 50 वर्षे महाराष्ट्रात राजकारण केले. ते देशाचे मोठे नेते आहेत. प्रमुख नेते आहेत आणि पुरस्कार कुणी द्यायचा, कुणी स्वीकाराचया हा ज्याचा त्याचा प्रश्न. संजय राऊत यांना पुरस्कार मिळाला नसल्याने त्यांच्या मनात खंत आहे. त्यामुळे ते बोलले. एकंदरित पवार साहेब हे प्रगल्भ नेते आहेत.