अमळनेर (जळगाव), 2 जुलै : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासह एकूण आठ जणांनी आज राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये जळगाव जिल्ह्याच्या वाट्याला एक मंत्रीपद आले आहे.
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांचीही मंत्रीपदी वर्णी लागली आहे. त्यांच्या रुपाने जळगाव जिल्ह्याला आणखी एक मंत्रीपद मिळाले आहे. राष्ट्रवादीचे अनिल भाईदास पाटील हे 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे शिरीष चौधरी यांचा पराभव करून विजयी झाले होते.
अनिल पाटील यांनी जिल्हा परिषद, बाजार समिती, जिल्हा बँक, नगरपरिषद अशा एकूण 15 पेक्षा जास्त निवडणुका लढवल्या आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या 2 वर्षांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, आज शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये अनिल पाटील यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडली आहे. यामुळे अमळनेर शहरात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला.
दरम्यान, अनिल पाटील यांच्या रुपाने जळगाव जिल्ह्याला आणखी एक मंत्रीपद मिळाले. याआधी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये शिंदे गटाचे गुलाबराव पाटील तर भाजपचे आमदार गिरीष महाजन यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.