चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
अहमदनगर, 30 मार्च : शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर करण्यात आली. या पहिल्या यादीत पाच जागांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, निलेश लंके आणि भास्करराव भगरे व अमर काळे यांना उमेदवारी देण्यात आली. दरम्यान, काल आमदारकीचा राजीनामा देणारे निलेश लंके यांना खासदारकी जाहीर झाल्याने अहमदनगरात जोरदार लढत रंगणार आहे.
निलेश लंके यांना खासदारकीसाठी उमेदवारी जाहीर –
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांनी काल आमदारकीचा राजीनामा देत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कठीण निर्णय घेत असल्याचे सांगितले होते. दरम्यान, शरद पवार गटाची पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली. या यादीत अहमदनगर लोकसभा निवडणुकीसाठी निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. निलेश लंके यांना काल आमदार पदाचा राजीनामा दिला आणि आज संध्याकाळी निलेश लंके यांना थेट लोकसभा निवडणुकीचे तिकिट मिळाल्याने याची मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे.
निलेश लंके विरूद्ध डॉ. सुजय विखे-पाटील –
निलेश लंके यांना खासदारकीसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता ते थेट राज्याचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. यापुर्वी, सुजय विखे यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांचा पराभव केला होता. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून एकतर्फी वाटणारी अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सुजय विखेंच्या बाजुने एकतर्फी तयार झालेले वातावरण आता बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे. खासदार डॉ. सुजय विखे-पाटील आणि निलेश लंके या दोघांमध्ये जोरदार लढत होणार असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा : उन्मेष पाटील नाराज? भाजपच्या खासदारकीच्या उमेदवार स्मिता वाघ यांचं महत्वाचं भाष्य