चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 20 एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ठ केल्यानंतर रक्षा खडसेंनी रोहिणी खडसे यांनी देखील भाजपात येण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे म्हटले होते. मात्र, रोहणी खडसे यांनी रक्षा खडसे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाल्या रोहिणी खडसे? –
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे म्हणाल्या की, रक्षा खडसे यांना भाजपमध्ये कोणाला घ्यायचे आणि कोणाला नाही, याचा अधिकार नाही. तो सर्वस्वी निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेत असतात. मी राष्ट्रवादी शरद पवार गटात महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत असून पुढेही याच पक्षात शरद पवार यांच्या नेतृत्वात मी काम करत राहणार आहे.
रोहिणी खडसे मुक्ताईनगरातून लढणार –
रोहणी खडसे पुढे म्हणाल्या की, आगामी काळात आपण याच पक्षातून मुक्ताईनगर विधानसभा निवडणूक लढविणार आहे. भाजपमध्ये जाण्याचा कोणताही प्रश्नच नाही. उलट रक्षा खडसे यांच्यावर राष्ट्रवादी पक्षात येण्याची वेळ यायला नको, असा टोला रोहिणी खडसे यांनी रक्षा खडसे यांना लगावला.
काय म्हणाल्या होत्या रक्षा खडसे? –
रोहिणी खडसे यांच्या राष्ट्रवादीत राहण्याच्या भूमिकेबाबत रक्षा खडसे म्हणाल्या होत्या की, रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादीत राहण्याचा निर्णय घेतला. आणि तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. रोहणी खडसे महिला प्रदेशाध्यक्षा असून त्यांना शरद पवारांसोबत काम करण्याची इच्छा आहे. असे असले तरी त्यांनी भाजपसोबत येण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, जास्तीत जास्त लोक भाजपकडे कसे वळविता येथील याच्यासाठी आमचा प्रयत्न असेल, असे रक्षा खडसे यांनी सांगितले होते.
हेही वाचा : अमित शाह यांच्याकडे स्वत:ची कारसुद्ध नाही अन् कॅश केवळ 24 हजार रुपये, काय संपूर्ण बातमी?