चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 20 मार्च : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना भाजपने जळगाव जिल्ह्यात जाहीर केलेल्या उमेदवारीवरून अजूनही मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष (अजित पवार गट) संजय पवार यांनी भाजपच्या उमेदवारी बदलाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
भाजपने जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघासाठी स्मिता वाघ व रक्षा खडसे यांना उमेदवारी दिल्यानंतर जळगाव जिल्ह्यात नाराजी नाट्यास सुरूवात झाली. रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी दावेदार मानले जाणारे अमोल जावळे यांच्या समर्थकांनी राजीनामे दिले आहेत. तर दुसरीकडे उन्मेश पाटील यांना उमेदवारी नाकारल्यानंतर काहींना धक्का बसला आहे.
काय म्हणाले संजय पवार? –
भाजप लोकसभा निवडणुकीत उमेदवार बदलणार असल्याच्या चर्चा सुरू असताना संजय पवार म्हणाले की, निवडणुकांना अजून दोन महिने वेळ आहे. त्यामुळे भाजप काय करेल, हे काही सांगता येत नाही. राजकारणात काही सांगता येत नाही. मात्र, आज तरी आम्ही मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात काम करणार असल्याचे ते म्हणाले.
भाजप उमेदवार बदलणार? –
संजय पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भाजप उमेदवार बदलणार असल्याच्या चर्चांना सुरूवात झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा भाजप बदलणार असल्याचे मेसेज देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. यापूर्वी रावेर लोकसभा मतदार संघातील अमोल जावळे यांना उमेदवारी न मिळाल्याने नाराज कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले होते. मात्र, ते राजीनामा फेटाळण्यात आले आहेत.
मंत्री गिरीश महाजन यांचे स्पष्टीकरण –
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल जळगावात भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची नियोजन बैठक पार पडली. दरम्यान, या बैठकीला राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. उमेदवार बदलाच्या कुठेही चर्चा नाही. दोन्ही मतदारसंघात कोणीही पदाधिकारी नाराज नाही. तसेच अमोल जावळे यांचीही नाराजी दुर झाल्याचे यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण दिले.
जळगावात काल आयोजित केलेल्या बैठकीत जळगावचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील हे हजर नव्हते. मला दोन तासांपूर्वी मोबाईलद्वारे माहित झाल्याचे ते म्हणाले. पण बैठकीबाबत एक दिवस अगोदरच माहिती देण्यात आली होती, असे उज्वला बेंडाळे यांनी सांगितले. दरम्यान, खासदार उन्मेश पाटील यांच्या अनुपस्थितीमुळे ते देखील नाराज असल्याचे बोलले जात आहे. तसेच अमोल जावळे व त्यांच्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर केल्यानंतर आता रक्षा खडसे नाराज असल्याची चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, नाराजी नाट्यनंतरही रावेरची जागा बदलण्यात येणार असल्याची चर्चां सुरू आहेत.
हेही वाचा : “जीवनात पदे येतात आणि जातात. मात्र…..,” खासदारकीचे तिकिट कापल्यानंतर उन्मेष पाटील यांची पहिलीच प्रतिक्रिया