चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली, 5 जून : लोकसभा निवडणूक निकालात भाजपला अपेक्षित असे यश न मिळाल्याने देशात सत्तास्थापनेसाठी त्यांना एनडीएच्या घटक पक्षातील नेत्यांवर अवलंबून राहण्याची वेळ आलीय. यामध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. दरम्यान, आज दिल्लीत पार पडलेल्या एनडीएच्या बैठकीत एनडीएच्या घटक पक्षातील नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्याला सहमती दर्शवल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
सरकार स्थापन करण्याच्या दिल्लीत पार्श्वभूमीवर बैठक –
लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित असे बहुमत न मिळाल्याने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) घटक पक्षांना विश्वासात घेऊन भारतीय जनता पार्टी देशात सरकार बनवण्याच्या प्रयत्नात आहेत. यासाठी आज दिल्लीत एनडीएच्या घटक पक्षातील प्रमुख नेत्यांची पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत बैठक पार पडली. तर दुसरीकडे इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्यांची देखील दिल्लीत बैठक पार पडतेय. दरम्यान, एनडीएतील काही नेत्यांचे मन वळवून त्यांना सोबत घेत सत्ता स्थापन करायची की विरोधात राहून सरकारची कोंडी करावी, असा विचार सध्या इंडिया आघाडीत सुरू असल्याचे समोर आले आहे.
नरेंद्र मोदींचा 8 जूनला शपथविधी? –
दिल्लीमध्ये आज एनडीएची सत्तास्थापनेसाठी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे उपस्थित होते. या बैठकीत एनडीएच्या घटक पक्षातील नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्याला सहमती दर्शवल्याने नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा झाली नसली तर नरेंद्र मोदी हेच देशाचे एनडीएचे नेतृत्व करणार असून 8 जून रोजी ते पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याचे समजते.
हेही वाचा : Smita Wagh : विजयानंतर स्मिता वाघ Special Interview