चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
पाचोरा, 02 फेब्रुवारी : राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू म्हणून स्थान निर्माण करणे, हे अनेकांचे स्वप्न असते. पण त्यासाठी कठोर परिश्रम, मेहनत, जिद्द, सातत्य आणि चिकाटी हे गुण अत्यंत आवश्यक आहे. त्यातही ग्रामीण भागातील तरुण-तरुणींना आपली स्वप्न पूर्ण करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा त्यात अपयशही येते. मात्र, या सर्व परिस्थितीत सर्व समस्यांवर मात जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरातील एका मुलीची राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सायली दिपक पाटील असे या मुलीचे नाव आहे. सायली ही पाचोरा शहरातील न्यू बुऱ्हानी इंग्लिश मिडियम स्कूलची विद्यार्थिनी आहे. सायली पाटील हिची राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या 17 वर्ष आतील संघात निवड झाली आहे. यासोबतच सायलीने जिल्ह्यातील प्रथम महिला राष्ट्रीय क्रिकेट खेळाडू होण्याचा मान पटकावला आहे.
21 जानेवारी 2025 ते 24 जानेवारी 2025 या कालावधीत सोलापूर येथे शालेय क्रीडा स्पर्धा पार पडल्या. या शालेय क्रीडा स्पर्धेत नाशिक विभागातून न्यू बुऱ्हानी इंग्लिश मिडियम स्कूल पाचोराची अंडर-17 मुलींच्या संघाची राज्यस्तरावर निवड झाली होती. यामध्ये आता सायली दिपक पाटील हिची महाराष्ट्राच्या 17 वर्षे खालील महिला संघात स्थान मिळाले आहे. यानंतर ती आता हरियाणा येथील पंचकूला येथे 3 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी दरम्यान आयोजित राष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळणार आहे.
सायली पाटील ही भडगाव तालुक्यातील अंजनविहिरे गावाची कन्या आहे. तसेच तिचे वडील दिपक पाटील हे माजी सैनिक आहेत. सध्या ते पाचोरा येथे स्थायिक झालेले आहेत. 15 फेब्रुवारी 2009 रोजी तिचा जन्म झाला. तसेच पहिली पासूनच ती न्यू बुऱ्हानी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. आता ती दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. जळगाव जिल्हा क्रिकेट असोशिएनच्या महिला क्रिकेट संघाचीही ती कर्णधार आहे. सायलीला न्यू बुऱ्हानी इंग्लिश मिडिअम स्कूलचे प्राचार्य डी. पी. देवरे सर तसेच क्रीडाशिक्षक अभिषेक भावसार, सुशांत जाधव व पंकज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. महाराष्ट्राच्या महिला संघात तिची निवड झाल्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

उद्यापासून पंचकुला येथे स्पर्धेचे आयोजन –
पंचकुला येथे उद्या 3 फेब्रुवारीपासून ते 7 फेब्रुवारी दरम्यान 68 व्या राष्ट्रीय शालेय खेळांच्या 17 वर्षांखालील महिला क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत देशभरातील विविध राज्यातील एकूण 25 संघ खेळणार आहेत.
उद्यापासून ही स्पर्धा 3 फेब्रुवारी रोजी सतलज पब्लिक स्कूल, सेक्टर 4 येथे सुरू होईल. जिल्ह्यातील पाच ठिकाणी सामने होणार आहेत. स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या या स्पर्धेत आंध्र प्रदेश, ओडिशा, दिल्ली, गुजरात, हरियाणा, केरळ, महाराष्ट्र, पंजाब, तामिळनाडू, उत्तर प्रदेश यांसह इतर राज्यांतील संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये महाराष्ट्राच्या संघात पाचोरा येथील खेळाडू सायली पाटील हिची निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, या स्पर्धेमुळे युवा क्रिकेटपटूंना त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठी आणि राष्ट्रीय स्तरावर त्यांच्या राज्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी एक व्यासपीठ मिळणार आहे. पाचोऱ्याच्या खेळाडूकडे सर्व जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.