जळगाव, 31 ऑगस्ट : गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यभरासह जळगाव जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पुढील पाच दिवस पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, उन्हाच्या कडाक्याने नागरिक हैराण झाले असताना पुन्हा एकदा पावसाची प्रतिक्षा केली जात आहे.
राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज –
अरबी समुद्रात, तसेच बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील चार ते पाच दिवस कोकण, विदर्भात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पुढील दोन दिवस काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. मात्र, 6 सप्टेंबरदरम्यान आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असल्याने राज्यात पुढील काही दिवस पाऊस वाढण्याची शक्यता आहे.
जळगाव जिल्ह्याचा आजचा हवामान अंदाज –
जळगाव जिल्ह्यात मागील आठवड्यात संततधार पाऊस झाल्याने शेतीची कामे खोळंबली होती. मात्र, पावसाने उघडीप दिल्यामुळे शेती कामांना वेग आला आहे. तर दुसरीकडे गेल्या दोन-तीन दिवसांपासून कडाक्याचे ऊन पडत असल्याने उकाडा जाणवत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, या उन्हाच्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. असे असताना आज ढगाळ वातावरण राहणार असून जळगाव जिल्ह्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाची शक्यता –
अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दक्षिण गुजरात किनारपट्टी ते केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालाय. यामुळे राज्यात पुढील चार ते पाच दिवस बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकण व गोव्यात, तसेच विदर्भात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा देखील अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हेही वाचा : चिंचोली येथील प्रस्तावित ‘मेडिकल हब’ ची मंत्री गिरीश महाजन यांच्यासह अधिकाऱ्यांनी केली पाहणी