जळगाव, 21 मे : भारतीय प्रशासकीय सेवेतील महाराष्ट्र कॅडरच्या 2019 च्या बॅचच्या अधिकारी मिनल करनवाल यांनी जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा मागील महिन्यात पदभार हाती घेतला. हा पदभार हाती घेतल्यानंतर अनेक मान्यवर त्यांच्या कार्यालयात स्वागतासाठी भेटीला येत असतात. दरम्यान, मिनल करनवाल यांनी स्वागताला येणाऱ्या अभ्यागतांसाठी ‘बुके नको, वह्या आणा’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत वंचित घटकातील विद्यार्थ्यांना त्यांनी केलेल्या पाहणी दौऱ्यात वह्या व पेन वाटप केले.
वंचित घटकातील विद्यार्थ्यांना वह्या व पेन वाटप –
मिनल करनवाल यांनी जळगाव येथे रुजू झाल्यानंतर स्वागताला येणाऱ्या अभ्यागतांसाठी ‘बुके नको, वह्या आणा’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाला प्रतिसाद देत अनेक अभ्यागतांनी भेटीला येताना वह्या आणून मोठा प्रतिसाद या उपक्रमाला दिला होता. यामध्ये मिळालेल्या वह्या व पेन मिनल करनवाल यांनी या कानळदा, आव्हाने, घर्डी तसेच भोलाने या गावांना भेट देताना वंचित घटकातील विद्यार्थ्यांना वाटप केल्या. या वेळी या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेनासा असा होता. यामुळे मिनल करनवाल यांच्या ‘बुके नको, वह्या आणा’ या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मिनल करनवाल यांचा परिचय –
भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2019 च्या बॅचच्या अधिकारी मीनल करनवाल यांची जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारीपदी एप्रिलमध्ये नियुक्ती करण्यात आली. मीनल करनवाल या मूळच्या उत्तराखंडमधील देहरादूनच्या असून दिल्लीत त्यांचं शिक्षण झालंय. दरम्यान, भारतीय प्रशासकीय सेवेत रूजू झाल्यानंतर त्यांनी भंडारा जिल्ह्यात प्रशासकीय कालावधी पुर्ण केला. यानंतर सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी, ITDP, नंदुरबार येथे काम पाहिले. आता नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. दरम्यान, आता मीनल करनवाल जळगावात झेडपी सीईओ म्हणून कार्यरत आहेत.