मुंबई, 20 जुलै : राज्यात यावर्षी सुरूवातीला कमी पाऊस झाला असला तरी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या पेरण्या केल्या आहेत. पण, अनेक ठिकाण्या बोगस बियाणांमुळे बियाणे उगवण्यास अडचणी येत आहेत. अशा शेतकऱ्यांना आता बियाणे, खते आणि किटकनाशकाच्या संदर्भात व्हॉट्सअॅपवर तक्रार करता येणार आहे. राज्याच्या कृषी विभागाच्यावतीने व्हाट्सअॅप क्रमांक सुरू करण्यात आला आहे.
अशी करता येणार तक्रार –
खत-बियाणे विक्री करणारे केंद्रे विशिष्ट कंपनीचे खत किंवा बियाणे खरेदी करण्याची सक्ती करत असतील, चढ्या भावाने विक्री होत असेल, तसेच बियाणे, खते, कीटकनाशके आदींच्या खरेदीबाबत शेतकऱ्यांची काही तक्रार असेल तर ती 9822446655 या व्हाट्सअॅप क्रमांकावर उपलब्ध असलेल्या पुराव्यासह पाठवण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. तक्रारींबाबत शहानिशा करून तत्काळ कारवाई करण्यात येईल तसेच तक्रार देणाऱ्या शेतकऱ्यांचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे देखील कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विरोधक आक्रमक –
राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून शेतकऱ्यांच्या मुद्यांवरून विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. विरोधकांनी बोगस खते व बियाणांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याची बाब उघड केली. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रशासनाला शेतकऱ्यांना तक्रार करण्यासाठी व्हाट्स ॲप क्रमांक सुरू करण्याचा निर्देश दिले आहेत.