मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपालांचे निवासस्थान राजभवन मुंबई येथे आहे. या राजभवनाशी संबंधित महत्त्वाचे किस्से, महत्त्वाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजच्या वतीने आजपासून ‘राजभवनाचे किस्से’ ही विशेष मालिका सुरू करण्यात येत आहे. यासोबतच यामध्ये इतिहासाच्या पानांतून या पार्श्वभूमीखाली महाराष्ट्र राज्याशी संबंधित काही महत्त्वाच्या जुन्या घटनांबाबतही माहिती देण्यात येईल. या मालिकेच्या माध्यमातून राजभवनातील माननीय राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांच्याद्वारे लिखित एक विशेष लेख दर आठवड्याला प्रकाशित केला जाईल. या मालिकेतील आजचा हा पहिला लेख.
इतिहासाच्या पानातून : पहिल्या स्वातंत्र्य दिनी सरकारकडून रोजंदारी कामगारांना पगारी सुटी –
अठ्ठ्यात्तर वर्षांपूर्वी भारताला स्वातंत्र्य मिळत असताना तत्कालीन मुंबई राज्य शासनाने एका अधिसूचनेनुसार शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट 1947 व शनिवार दिनांक 16 ऑगस्ट 1947 सरकारमध्ये काम करीत असलेल्या रोजंदारी कामगारांना पगारी सुटी जाहीर केली होती.
मुंबई राज्य शासनाने दिनांक 12 ऑगस्ट 1947 रोजी एक स्वतंत्र जीआर काढला होता. त्याचा विषय होता: Holiday for Staff employed on daily wages.
काय होता हा ठराव ?
ठराव: ‘स्वातंत्र्य दिन सोहळ्या’निमित्त, दिनांक 15 व 16 ऑगस्ट 1947 या दोन दिवशी जाहीर करण्यात आलेल्या सुट्ट्या, सरकारी सेवेत रोजंदारीवर काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना पगारी सुट्ट्या समजण्यात याव्या, असा आदेश देताना सरकारला आनंद होत आहे.
ही विशेष सवलत टास्क व पीस वर्कर्स (कार्याच्या प्रमाणावर वेतन घेणारे कर्मचारी) यांनाही लागू करण्यात यावी. मात्र टंकलेखक (टायपिस्ट) यांना ही सवलत लागू होणार नाही.
या दोन सुट्ट्यांसाठी संबंधित कर्मचाऱ्यांना देय असलेले वेतन, त्या कर्मचाऱ्याने महिन्याच्या उर्वरित काळात मिळविलेल्या एकूण उत्पन्नाला त्या महिन्यात प्रत्यक्ष काम केलेल्या दिवसांच्या संख्येने भागून ठरविण्यात यावे.
या आदेशाखाली येणाऱ्या कर्मचाऱ्यांना जर या दोन्ही दिवसांपैकी कोणत्याही एका किंवा दोन्ही दिवशी काम करण्यास लावण्यात आले, तर त्यांनी प्रत्यक्ष केलेल्या दिवसांच्या किंवा तासांच्या कामाच्या कालावधीएवढी भरपाई स्वरूपात वेतनासह रजा पुढील कालावधीत देता येईल.
मुंबई प्रांताचे राज्यपाल यांच्या आदेशाने
(स्वाक्षरी)
जे. चाव्हेस
मुख्य सचिव, राजकीय व सेवा विभाग, मुंबई सरकार यांच्यावतीने देशाचा पहिला स्वातंत्र्यदिन साजरा करताना सरकारने आपल्या रोजंदारीवरील कामगारांना पगारी सुटी देण्याचा विचार केला ही गोष्ट उल्लेखनीय आहे. दिनांक 15 ऑगस्ट 1947 हा दिवस शुक्रवार होता. या वर्षी देखील स्वातंत्र्यदिन शुक्रवारीच आहे!
लेखन – श्री. उमेश काशीकर (माननीय राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी, राजभवन मुंबई)