जळगाव, 30 सप्टेंबर : ट्रान्सजेंडर व्यक्तीकडे माणूस म्हणून बघण्याचे आणि त्यांच्या अस्तित्वाला प्रतिष्ठा देण्याचे सामाजिक भान निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचा सूर ‘ट्रान्सजेंडर आणि सामाजिक भूमिका’ या विषयावर विद्यापीठाच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र प्रशाळेच्या वतीने आयोजित कार्यशाळेत व्यक्त झाला.
‘ट्रान्सजेंडर आणि सामाजिक भूमिका’ या विषयावर कार्यशाळा –
विद्यापीठातील माध्यमशास्त्र प्रशाळा आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल डिफेन्स, मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टीस अॅण्ड एम्पावरमेंट, नवीदिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. 30 सप्टेंबर रोजी ‘ट्रान्सजेंडर आणि सामाजिक भूमिका’ या विषयावर कार्यशाळा झाली. यावेळी अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू प्रा.एस.टी.इंगळे, प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड उपस्थित होते. या कार्यशाळेत सामाजिक कार्यकर्ते भरत अमळकर, रंगकर्मी शंभू पाटील, सामाजिक कार्यकर्ते जयसिंग वाघ व वासंती दिघे यांनी भूमिका मांडली.
मान्यवरांनी व्यक्त केले विचार –
निवृत्ती गायकवाड आपल्या भाषणात म्हणाले की, राज्यघटनेने ट्रान्सजेंडर व्यक्तींना देखील जगण्याचे अधिकार दिले आहेत. भारतीय विचारसरणीत एलजीबीटीक्यू समूहाला सुरक्षित वातावरण देण्याला आपण कमी पडत आहोत. त्यांना सुरक्षित वातावरण दिले जावे. शासकीय पातळीवर विविध कायदे केले जात आहेत असे ते म्हणाले. प्रा. एस.टी. इंगळे यांनी आपल्या भाषणात शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या तीन पातळयांवर समाज आणि शासनाने ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी काम केले तर प्रश्न सुटायला मदत होईल असे मत व्यक्त केले.
भरत अमळकर यांनी कोणतीही व्यक्ती जन्माला येण्याआधी आपले पुर्वग्रह जन्माला आलेले असतात असे सांगून ट्रान्सजेंडर व्यक्ती जन्मत: कुणी नसते. तर वयात आल्यानंतर शारीरिक बदल दिसून येतात. त्यावेळी त्यांना समाजाकडून उपेक्षा सहन कराव्या लागतात. संत साहित्य व अध्यात्मात लिंगाला कधीही मर्यादे पलिकडे महत्व दिलेले नाही. स्त्री आणि पुरूष या दोनच वर्गात समाज विभागला गेला आहे. ट्रान्सजेंडर वर्गाचे प्रश्न समजून वैज्ञानिक दृष्टीकोनातून त्याकडे बघावे असे मत त्यांनी व्यक्त केले. शंभू पाटील यांनी रामायण, महाभारत व पुरातन काळातील अनेक संदर्भ देत ट्रान्सजेंडर हा वर्ग पुर्वापार कसा वाटचाल करत आला आहे हे स्पष्ट केले. अनेक युरोपिय संकल्पना आपल्याकडे आल्यात. इंग्रजांनी राज्य करतांना त्या संकल्पना लादल्या आणि सामाजिक भान गमावून बसलो. या देशात स्त्रीयांसाठी लक्ष्मण रेषा आखली गेली. पंरपरा आणि सामाजिक वास्तव यामध्ये आपण कायम गोंधळलेलो आहोत. ट्रान्सजेंडर हीच मुळी समस्या नाही तर समाज म्हणून आपण काय आहोत, आपली सामाजिक भूमिका काय हाच खरा प्रश्न असल्याचे शंभू पाटील म्हणाले.
जयसिंग वाघ यांनी सर्व राजकीय प्रक्षांनी ट्रान्सजेंडर सेल सुरू करून या वर्गाशी संवाद साधला तर प्रश्न सुटायला मदत होईल. तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने पुढाकार घेवून ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी शिष्यवृत्ती ठेवली तर शिक्षणाचे प्रमाण वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली. वासंती दीघे यांनी पुरूषसत्ताक व लिंगसापेक्ष प्रतिष्ठा देणारी जीवन पध्दती आपल्याकडे असल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे असे सांगितले. ट्रान्सजेंडर व्यक्तीची कुटूंबाकडूनच हत्या होण्याचे प्रमाण वाढले आहे. या समूहाला दमनाला तोंड द्यावे लागते. त्यांना समूह न बघता व्यक्ती म्हणून बघितले जावे, संपत्तीत अधिकार द्यावा अशी अपेक्षा वासंती दिघे यांनी व्यक्त केली.
प्रारंभी माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक तथा कार्यशाळेचे मुख्य निमंत्रक प्रा. सुधीर भटकर यांनी प्रास्ताविकात कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. सह निमंत्रक डॉ. गोपी सोरडे यांनी सूत्रसंचालन केले. अॅड. सूर्यकांत देशमुख यांनी आभार मानले. अमोल पाटील या विद्यार्थ्यांने सत्राचे सूत्रसंचालन केले. परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांच्या उपस्थितीत या कार्यशाळेचा समारोप झाला. वैभव भोंबे यांनी आभार मानले. रंजना चौधरी, प्रल्हाद लोहार, मंगेश बविसाने, पंकज शिंपी, धनंजय देशमुख यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले.
हेही पाहा : जळगाव जिल्ह्यात ‘या’ तारखेपासून पुन्हा पावसाची शक्यता, आजचा काय आहे नेमका हवामान अंदाज?