नगाव, 8 फेब्रुवारी : धुळे जिल्ह्यातील नगाव येथील गंगामाई इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे “व्यक्तिमत्व विकास व उद्योजकता विकास” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. गंगामाई इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आणि रुमी कन्सल्टन्सी, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा पार पडली. यावेळी दोन्ही संस्थांमध्ये सामंजस्य करारही महाविद्यालया मार्फत करण्यात आला. यावेळी दोन सत्रांत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
पहिल्या सत्रात काय –
या कार्यशाळेचे प्रमुख उद्देश्य हे विद्यार्थ्यांमध्ये नोकरीच्या मुलाखतीदरम्यान आत्मविश्वास वाढावा व विद्यार्थ्यांनी औषधंनिर्माणशास्त्र क्षेत्रात विविध उद्योग कसे उभारावे, हा होता. पहिल्या सत्रात विद्यार्थ्यांना कम्युनिकेशन स्किल, ग्रुप डिस्कशन, ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग या विविध विषयांवर उदाहरणाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.
दुसऱ्या सत्रात काय –
यानंतर दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांना सीव्ही रायटिंग, विद्यार्थ्यांना नोकरी करता लागणारे विविध कौशल्य, मुलाखतीदरम्यान विचारले जाणारे प्रश्न, मुलाखतीमध्ये यश कसे संपादन करावे याचे ज्ञान तसेच जीवनाविषयी सकारात्मक दृष्टिकोन अशा विविध पैलूंबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष राम भदाणे यांचेही विद्यार्थांना मार्गदर्शन –
दरम्यान, या कार्यशाळेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष राम भदाणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जीवनात शैक्षणिक ज्ञानाबरोबरच मानसिक आणि अध्यात्मिक ज्ञानसुद्धा किती महत्वाचे आहे हे सांगितले, त्यासाठी अशाप्रकारची कार्यशाळा विद्यार्थांमध्ये एक नवसंजीवनी देण्याचे काम करते, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – धुळे : नगावात स्वच्छता अभियान संपन्न, गंगामाई अभियांत्रिकी महाविद्यालयाचा कौतुकास्पद उपक्रम
तर या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे सचिव मनोहर भदाणे, उपाध्यक्षा ज्ञानज्योती भदाणे यांनी प्रयत्न केले. तसेच महाविद्यालयाचे डी फार्मसी चे प्राचार्य एस. व्ही. चोरडिया, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. आर. एस. रडके व सर्व शिक्षकांचे या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी मोलाचे मार्गदर्शन केले.