एरंडोल (जळगाव), 1 ऑगस्ट : जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात बसचा अपघात झाल्याची घटना आज 1 ऑगस्ट रोजी दुपारी घडली. भडगाव आगारातून एंरडोलला जाणाऱ्या बसचा खडसे (खु.) गावाजवळ हा अपघात झाला. यामध्ये एका जणाचा मृत्यू झाला असून अंदाजे 40 जण जखमी झाले आहेत. गुलाब तुळशिराम माळी (रा. वडगाव बु॥ ता. भडगाव) असे मयताचे नाव आहे. या बस अपघात प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनमध्ये बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं? –
मिळालेल्या माहितीनुसार, भडगावरून एरंडोलला जाणारी बस क्र. MH 20/BL 3402 ही सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास खडके ते एरंडोल रोडवरील नायरा पेट्रोल पंपाजवळ असलेल्या दग्र्याजवळ आली असता भरधाव वेगात असल्याने रस्त्याचे खाली उतरुन डाव्या बाजूला पलटी झाली. त्यामुळे बसमध्ये बसलेले 40 ते 45 प्रवासी हे जखमी झाले.
यानंतर रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी पलटी झालेल्या बसमधील जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. बस अपघाताची माहिती पोलिसांनी मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी देखील तेथे जमलेल्या लोकांच्या मदतीने बसमधील सर्व प्रवाशांना बाहेर काढले. बसमधील सर्व प्रवासी बाहेर काढण्यात आले.
बस अपघातात एकाचा मृत्यू –
या बस अपघातात एकाचा मृत्यू झाला असून गुलाब तुळशिराम माळी (रा. वडगाव बु॥ ता. भडगाव) असे त्यांचे नाव आहे. तसेच खडके खुर्द गावातील (1) रोशनी प्रवीण पाटील, 2) भाग्यश्री पंकज पाटील, 3) मयुरी पंडीत पाटील, 4) मनिषा रुपेश पाटील यांचेसह बसमधील इतर 35 ते 40 प्रवासी हे जखमी झाले. यामध्ये बसचालक ज्ञानेश्वर भास्कर चव्हाण (रा. सावदे ता. एरंडोल) हे देखील यामध्ये जखमी झाले असून त्यांना एरंडोल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
View this post on Instagram
बसचालकाविरोधात गुन्हा दाखल –
भडगाववरून एरंडोलकडे जाणाऱ्या या बसमध्ये महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी-विद्यार्थीनी देखील प्रवास करित होते. दरम्यान, बसवरील चालक रस्त्याच्या परिस्थीतीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने व वेडीवाकडी चालवीत होता असे सांगितले जात आहे. याप्रकरणी बस अपघातात जखमी झालेल्या उन्नती धनसिंग पाटील (रा. खडके खु. ता. एरंडोल) हिच्या फिर्यादीवरून बसचालक ज्ञानेश्वर भास्कर चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एरंडोल पोलीस स्टेशनचे हेड कॉन्टेबल बापू लोटन पाटील हे करित आहेत.