मुंबई, 21 नोव्हेंबर : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21 व्या हप्त्याचे वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तामिळनाडू राज्यातील कोईम्बतूर येथून ऑनलाइन पद्धतीने हे वितरण झाले. दरम्यान, महाराष्ट्रातील 90 लाख 41 हजार 241 पात्र शेतकरी कुटुंबांच्या खात्यात 1 हजार 808 कोटी 25 लाखांची रक्कम जमा होणार आहे.
कृषी मंत्री दत्ता भरणे यांची प्रतिक्रिया –
केंद्र सरकार व राज्य सरकारच्यावतीने शेतकऱ्यांना सन्मान निधीचे वाटप केले जाते. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21 व्या हफ्त्याचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यापूर्वी, राज्य शासनाने ही अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून भरीव रक्कम वितरित करण्याचं काम केले आहे. दरम्यान, या नवीन 21 व्या हप्त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना लागवड, बियाणे, उपजीविका आणि इतर कृषी खर्चासाठी आवश्यक असे तातडीचे आर्थिक बळ मिळणार असल्याची प्रतिक्रिया राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याची रक्कम 2 ऑगस्ट 2025 ला शेतकऱ्यांच्या खात्यात आली होती. पीएम किसान सन्मान निधी योजना ही 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरु करण्यात आली होती. योजनेचा पहिला हप्ता 24 फेब्रुवारी 2019 ला शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आला होता आणि तेव्हापासून 20 हप्त्यांची रक्कम पाठवण्यात आली आहे. आता या योजनेचे 21 व्या हप्त्याचे वितरण करण्यात आलंय. यासोबत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 रुपये दिले जातात.
पीएम किसानच्या यादीत नाव कसं शोधायचं?
-
तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या https://pmkisan.gov.in/rpt_beneficiarystatus_pub.aspx या वेबसाईटला भेट द्या.
-
राज्य निवडा असा पर्याय आहे त्यात महाराष्ट्राची निवड करा.
-
तुमचा जिल्हा निवडा.
-
तालुका निवडा.
-
गावाचं नाव निवडा, यानंतर गेट रिपोर्टवर क्लिक करा. यानंतर तुमच्या गावातील शेतकऱ्यांची यादी ओपन होईल.
-
या यादीत तुमचं नाव शोधा.






