चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
पाचोरा, 30 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघनिहाय राजकीय वातावरण तापायला सुरूवात झालीय. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवट दिवस असताना पाचोऱ्यात डमी उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे.
नेमकं काय प्रकरण? –
वैशाली किरण सुर्यवंशी आणि अमोल शांताराम शिंदे असे नामसाधर्म्य असलेल्या दोन उमेदवारांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी तहसील कार्यालयात गोंधळ उडाल्याने गर्दीला आवरण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला होता. दरम्यान, नावात सारखेपणा असलेल्या या दोन जणांचे अर्ज दाखल करुन घेताना प्रशासनाकडून राबविण्यात आलेल्या प्रक्रियेवर विरोधकांनी आक्षेप घेत याप्रकरणी आमदार किशोर पाटील यांच्यावर आरोप केले आहेत.
आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यावर हल्लाबोल –
शिवसेना ठाकरे गटाच्या वैशाली सुर्यवंशी, माजी आमदार दिलीप वाघ तसेच अपक्ष उमेदवार अमोल शिंदे यांनी वैयक्तिक पत्रकार परिषद घेत पाचोऱ्यात डमी उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याप्रकरणी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच हे डमी उमेदवार आमदार किशोर आप्पा पाटील यांनीच उभे केले असल्याचाही आरोप वैशाली सुर्यवंशी, दिलीप वाघ तसेच अमोल शिंदे यांनी केला आहे.
आमदार किशोर आप्पा पाटील प्रत्युत्तर देणार? –
पाचोऱ्यात आज मराठा समाज बांधवांच्या मेळाव्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतला. दरम्यान, आता डमी उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याप्रकरणी पाचोऱ्यात राजकीय वातावरण तापल्यानंतर आमदार किशोर आप्पा पाटील हे विरोधकांच्या आरोपांना काय प्रत्युत्तर देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.