ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 25 जून: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्या अधिक अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक करण्यासाठी विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision) मोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत जळगाव जिल्ह्यासह १८ पाचोरा विधानसभा मतदारसंघातही विशेष मतदार यादी पुनरिक्षण अभियान सुरू असून मतदारांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा पाचोरा उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांनी केले आहे.
७ ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार –
निवडणूक आयोगाने राज्यात २० जून ते ७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत टप्प्याटप्प्याने हे कामकाज राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार ३० जून ते २९ जुलै २०२६ दरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) घरोघरी जाऊन मतदारांची माहिती संकलित करणार आहेत. त्यानंतर ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
प्रारूप यादीवर ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. तसेच ५ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर २०२६ दरम्यान संबंधित दावे व हरकतींवर सुनावणी घेण्यात येणार असून, मतदारांना निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या ११ प्रकारांपैकी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
पाचोरा व भडगाव तालुक्यांसाठी एकूण १५ सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना मदतीसाठी इतर कर्मचाऱ्यांचीही नेमणूक करण्यात आली आहे. सध्या १८ पाचोरा विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लाख २४ हजार ३४३ मतदार असून त्यापैकी २ लाख ८२ हजार ८१५ मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे. ही टक्केवारी ८७.२० इतकी आहे. अद्याप ४१ हजार ५२८ मतदारांचे मॅपिंग बाकी असून ३० हजार २७४ मतदारांच्या नोंदींमध्ये विसंगती आढळून आली आहे. या त्रुटी दूर करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत कार्यवाही सुरू आहे.
या मोहिमेबाबत मतदारसंघातील विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली असून मतदार यादी पुनरिक्षणाच्या कामात सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनाही करण्यात आले आहे. तसेच प्रसारमाध्यमांनी या अभियानाला व्यापक प्रसिद्धी देऊन मतदारांमध्ये जनजागृती निर्माण करावी, असेही आवाहन प्रशासनाने केले आहे.






