पाचोरा, 2 जानेवारी : पाचोरा तालुक्यातील सारोळा बुद्रुक येथील शेतकऱ्यांना विद्युत रोहित्र गेल्या एक महिन्यापासून त्रास देत असल्याने विज पुरवठा सुरळीत होत नाही. तर भडगाव तालुक्यातील पिचर्डे येथील शेतकऱ्यांचे विद्युत रोहित्र मागील 20 दिवसांपासून जळाले आहे. त्यामुळे सबंधित शेतकऱ्यांचे उभे पिक जळाले लागले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी वारंवार महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र, तरीसुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील या समस्येच्या पार्श्वभूमीवर आज पाचोरा महावितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयात काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी हल्लाबोल केला. यावेळी प्रभारी कार्यकारी अभियंता शिरसाठ यांनी निवेदन स्वीकारले. तसेच तत्काळ हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. प्रभारी कार्यकारी अभियंता शिरसाठ यांनी शेतकऱ्यांच्या भावना समजून तत्काळ मागणी मंजूर केली. मागणी मंजूर झाल्यावरच शेतकऱ्यांनी महावितरणचे कार्यालय सोडले.
यावेळी कोण होतं उपस्थित –
यावेळी भडगाव तालुक्यातील पिचर्डे येथील शेतकरी लक्ष्मण पाटील, अरुण पाटील, विठ्ठल पाटील, अमोल पाटील, राजेंद्र पाटील, मधुकर पाटील, सारोळा बुद्रुक येथील शेतकरी रुपेश पाटील, रमेश भदाणे, संदीप भदाणे, जगदीश शेलार, शांताराम चौधरी, गणेश तायडे, नितीन पाटील, भरत महाजन, राहुल शिंदे, भागवत जगताप, गोकुळ पाटील, विठ्ठल शेलार, आदी उपस्थित होते. दरम्यान, या आंदोलनानंतर शेतकऱ्यांची मागणी मान्य झाल्यावर त्यांच्या चेहर्यावर आनंद दिसत होता.