ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 23 सप्टेंबर : पाचोरा शहरातील गिरणा पंपींग रोड परिसरात पोलिसांनी सापळा रचून गावठी कट्टा, जिवंत काडतूस व मोटारसायकलसह एकाला रंगेहाथ पकडले. याप्रकरणी समाधान बळीराम निकम (वय 37 वर्षे, रा. जाधववाडी, गिरणा पंपींग रोड, पाचोरा, जि. जळगांव, मुळ रा. अंजाळा, ता. यावल, जि. जळगांव) याला पाचोरा पोलिसांनी अटक केली असून त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पाचोरा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
काय आहे संपुर्ण बातमी? –
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पाचोरा पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मंगलम पार्क परिसरात छापा टाकण्यात आला. त्यावेळी समाधान बळीराम निकम (वय 37, रा. जाधववाडी, पाचोरा, मुळगाव अंजाळा, ता. यावल) हा इसम मोटारसायकलवर संशयास्पदरीत्या फिरताना आढळला. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी पिस्तूल, एक जिवंत काडतूस, मॅग्झीन व सुमारे 50 हजार रुपयांची मोटारसायकल मिळून एकूण 73 हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला.
पोलिसांनी केली आरोपीस आरोपीस अटक –
या प्रकरणी समाधान निकम याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3 व 25 अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वीही जळगाव जिल्ह्यात विविध प्रकरणात 8 गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
यांनी केली कामगिरी –
सदरची कामगिरी ही जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेडडी, चाळीसगांव परिमंडळाच्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर पवार, उप विभागीय पोलीस अधिकारी अरुण आव्हाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोउपनिरी कृष्णा घायाळ, सफौ. रणजित देवसिंग पाटील, पोहेकॉ राहुल काशिनाथ शिंपी, पोकॉ योगेश सुरेश पाटील, पोकॉ शरद पाटील, पोकॉ. गणेश कुवर, पोकॉ श्रीराम शिंपी व स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ लक्ष्मण अरुण पाटील, पोहेकॉ राहुल पाटील, जितेंद्र सुरेश पाटील, भूषण पाटील यांनी पार पाडली.