ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 17 नोव्हेंबर : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर पाचोरा नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या पत्नी सुनिताताई पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. पाचोरा नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना मोरे यांच्याकडे सुनिताताई पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
पाचोऱ्यात शिवसेनेचे शक्तीप्रदर्शन –
पाचोरा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी सुनिताताई पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यानिमित्त आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेकडून रॅली काढण्यात आली. या रॅलीची पाचोरा शहरातील भारत डेअरी स्टॉप, कृष्णापुरी चौक, आठवडे बाजार, श्री बालाजी मंदिर रथ गल्ली, गांधी चौक, सराफ बाजार, मुख्य रस्ता जामनेर रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्टेशन रोड ते नगरपरिषद कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात आली. या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पाचोऱ्यात शिवसेनेचे शक्तीप्रदर्शन पाहायला मिळाले.
याप्रसंगी शिवसेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख सुनिल पाटील, माजी जि.प. सदस्य पदमसिंह पाटील, शिवसेनेचे दीपकसिंह राजपूत, विनोद तावडे, किशोर बारावकर, सुमित सावंत, शरद पाटे, डॉ. प्रियंका पाटील, ललिता पाटील, मंदाकिनी पारोचे, प्रतिताई सोनवणे, अस्मिता पाटील, सूषमा पाटील, युवानेते सुमित पाटील, प्रविण ब्राम्हणे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुनिताताई पाटील विरूद्ध सुचेताताई वाघ यांच्यात थेट लढत –
पाचोरा-भडगावचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या पत्नी सुनिताताई पाटील यांनी पाचोरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद भूषवले असून त्या पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आमदार किशोर आप्पा पाटील यांनी स्वबळाची घोषणा केली असल्याने पाचोरा आणि भडगावध्ये त्यांच्या नेतृत्वात शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवत आहे.
तर दुसरीकडे भाजपकडून नगराध्यपदासाठी माजी आमदार दिलीप वाघ यांच्या पत्नी सुचेताताई वाघ यांना उमेदवारी मिळाली असून त्यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलाय. दरम्यान, पाचोरा नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी सुनिताताई पाटील विरूद्ध सुचेताताई वाघ अशी थेट लढत होणार असल्याचे चित्र सध्यास्थितीत दिसून येत आहे.
हेही वाचा : Jalgaon News : सुपोषित जळगाव उपक्रमांतर्गत जिल्ह्यात सामूहिक सूर्यनमस्काराचे आयोजन







