ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 24 ऑक्टोबर : महायुतीतील भाजप, शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये शिवसेनेकडून पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार किशोर आप्पा पाटील यांना तिसऱ्यांदा तिकिट देण्यात आले आहे. यानंतर आज आमदार किशोर आप्पा पाटील यांनी तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी पाचोऱ्यात त्यांचे मोठे शक्तीप्रदर्शन पाहायला मिळाले.
पाचोऱ्यात किशोर आप्पा पाटील यांचे शक्तीप्रदर्शन –
विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर आमदार किशोर आप्पा पाटील यांनी जागावाटपा आधीच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख जाहीर केली होती. त्यानुसार, आज 24 ऑक्टोबर रोजी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार किशोर आप्पा पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जनसभेचे आयोजन करण्यात आले होते. पाचोऱ्यातील मोंढाळा रोडवरील तुळजाई जिनिंग याठिकाणी ही सभा पार पडली. यानंतर जळगाव चौफुली वरून रॅलीला सुरूवात होऊन भारत डेअरी, कृष्णापुरी चौक, आठवडे बाजार, गांधी चौक, जामनेर रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते प्रांत कार्यालयापर्यंत पोहचली. दरम्यान, या मोठ्या रॅलीत यावेळी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेना नेते गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल –
पाचोरा-भडगाव या विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील हे मागील 10 वर्षांपासून प्रतिनिधित्व करत आहेत. सलग दोन वेळा ते या मतदरासंघाचे आमदार असून आता त्यांनी तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, या मतदारसंघात आतापर्यंत सलग तिसऱ्यांदा एकाही उमेदवाराने विजय मिळवला नाहीये. म्हणून आमदार किशोर आप्पा पाटील हे तिसऱ्यांदा निवडून येऊन मतदारसंघात इतिहास घडवणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.