पाचोरा (प्रतिनिधी), 16 एप्रिल : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची येत्या 23 एप्रिलला पाचोरा येथे जाहीर सभा होणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत आणि इतर नेते उपस्थित राहतील. त्यामुळे उद्धवजी ठाकरे यांच्या जळगांव जिल्हा दौरा रूपरेषा आणि कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी काल 15 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीला मा. संपर्कप्रमुख संजयजी सावंत, सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जळगांवच्या महापौर जयश्री महाजन, विधानसभा संपर्कप्रमुख सुनील पाटील, जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, दिपकसिंग राजपूत, विष्णू भंगाळे, समाधान महाजन, महानंदाताई पाटील. पाचोरा तालुक्यातील शिवसेना नेत्या वैशाली सुर्यवंशी, विराज कवडिया, चैतन्य बनसोडे, शेतकरी सेनेचे अरुण पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक रमेश जी बाफना, युवा सेना उपजिल्हाधिकारी संदीप जैन, तसेच इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. पाचोरा येथील भडगाव रोडवरील निर्मल इंटरनॅशनल स्कुल येथे ही बैठक संपन्न झाली.
बैठकीत संजय सावंत काय म्हणाले?
या बैठकीत संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी सांगितले की, जळगाव जिल्ह्यातील पाचही गद्दार आमदारांना धडा शिकवणार असुन त्यासाठी सर्वांनी पक्ष बळकट करण्यासाठी तयारीला लागा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची सभा ही रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी तयारीला लागले पाहिजे. प्रत्येक गावागावात बैठका घ्या, प्रत्येक कार्यकर्त्याला आव्हान करा. आपल्याला काही अडचण असल्यास जिल्हाप्रमुखांना सांगा, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, बैठकीनंतर संपर्कप्रमुख संजय सावंत आणि उपस्थित मान्यवरांनी सभेच्या जागेची पाहणी केली. सुरुवातीला उद्धव ठाकरे आणि इतर नेते पाचोरा येथे माजी आमदार आर. ओ. पाटील यांच्या स्मारकाचे अनावरण करतील. तसेच मायकोरायझा लॅबचे उद्घाटन करतील. यानंतर पाचोरा येथील अटल मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे. उद्धव ठाकरे आपल्या सभेत बंडखोर आमदारांबद्दल काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.