पाचोरा, 30 डिसेंबर : जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक भुकन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 31 डिसेंबर तसेच नवीन वर्षाच्या स्वागतार्थ अवैध मद्य विक्री तसेच निर्मिती व वाहतूक करणाऱ्यांविरोधात सर्वत्र जळगाव जिल्ह्यात दारूबंदी विभागाच्या वतीने धडक मोहीम राबवली जात आहे. यामध्ये पाचोरा तालुक्यात अवैध दारू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात आली.
पाचोरा विभागाचे दुय्यम निरीक्षक विलास पाटील तसेच त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी गिरीश पाटील यांनी आज जामनेर-बोदवड रस्त्यावर अवैधपणे ताडी (मद्य) वाहतूक करणारी मारुती इको गाडी क्रमांक एम एच 02 एफ इ 9947 या क्रमांकाची गाडी जप्त करण्यात आली आहे. तसेच यामधील 400 लिटर तयार ताडी आणि आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. मोहमद अजीद असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 अ, ई अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच याबाबत पुढील तपास विलास पाटील करीत आहेत.
उद्या 2023 हे वर्ष संपत आहे. यामुळे अनेक जण सरत्या वर्षाला निरोप देत आणि नवर्षाचं स्वागत वेगवेगळ्या ठिकाणी करत आहेत. अनेक जण देवदर्शनाला जातात तर कुणी विविध ठिकाणी पार्टी करतात. थर्टी फर्स्ट म्हटलं की एकीकडे दारु पिऊन झिंगणारे लोक दिसतात तर दुसरीकडे दारू नाही दूध प्या म्हणून जनजागृती करणारेही पाहायला मिळतात. यातच आता पाचोरा तालुक्यात ही कारवाई करण्यात आली आहे.