चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
अमरावती, 18 मे : स्पर्धा परिक्षेतील ध्येयाच्या प्राप्तीसाठी अभ्यासात सातत्य ठेवत प्रयत्न केल्यास यश हमखास मिळते. याचेच एक उदाहरण म्हणजे अमरावती येथील पल्लवी राजकुमार खंडारे. पल्लवी ह्या तरूणीची नुकतीच एमपीएससीद्वारे घेण्यात आलेल्या परिक्षेत ‘मंत्रालय लिपिक’ या पदावर नियुक्ती झाली आहे. यानिमित्त पल्लवीने ‘सुवर्ण खान्देश लाईव्ह’सोबत संवाद साधत तिच्या यशाबद्दल माहिती दिली.
पल्लवीच्या यशाची प्रेरणादायी कहाणी –
पल्लवी ही मुळची अमरावती येथील रहिवासी आहे. तिच्या वडिलांचे किराणा दुकान असून आई गृहिणी आहे. तर तिच्या दोघी बहिणी देखील सरकारी नोकरीसाठी तयारी करत आहेत. पल्लवीचे आनंद विद्यालयातून दहावीपर्यंत शिक्षण झाले. तर तिने विज्ञान शाखेतील बारावीपर्यंतचे शिक्षण व्ही.एम. व्ही. कॉलेजमधून पुर्ण केले. पल्लीवीने 2019 साली कला शाखेत पदवी पुर्ण केली. यानंतर तिने स्पर्धा परिक्षेच्या तयारीस सुरूवात केली.
स्पर्धा परिक्षेस सुरूवात –
पदवीचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर विदर्भ आयएएस अॅकेडमी जॉईन केल्यानंतर स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासास सुरूवात केली. दैनंदिन अभ्यास सुरू असताना मध्यंतरी कोरोना महामारीस सुरूवात झाली. यामुळे क्लासेस बंद झाले आणि घरीच राहून अभ्यास सुरू केला. मात्र, घरी किराणा दुकान असल्याने वडिलांना मदत म्हणून देखील किराणा दुकानात काम करावे लागत होते. कोरोना काळात आयोगाकडून कुठलीही जाहिरात निघत नसल्याने प्रचंड नैराश्य आल्यासारखे वाटत होते. दरम्यान, लॉकडाऊनची बंदी उठल्यानंतर पल्लवीने विद्याभारती लायब्ररी जॉईन करत सेल्फ स्टडीवर भर दिला आणि अभ्यास सुरू ठेवला. यामध्ये लायब्ररीमध्ये जाऊन जास्तीत जास्त वेळ अभ्यास केला.
मंत्रालयात लिपिकपदी झाली निवड –
पल्लवीने 2021 साली राज्यसेवेची परीक्षा दिली. मात्र, त्यामध्ये कमी मार्क्स आले. यानंतर तिने एमपीएससी संयुक्त परीक्षा (MPSC Combined) पुर्णवेळ तयारी करत 2021 साली पुर्व परिक्षेत यश मिळवले. मात्र, मुख्य परिक्षेत तिला अपयश आले. दरम्यान, 2021 साली एमपीएसच्या ‘क’ गटासाठी ती मुख्य परिक्षेत पात्र ठरली. यानंतर पल्लवीने टायपिंग टेस्ट पास केली आणि राज्यातून मागासवर्गीय महिला प्रवर्गातून 27 वी रँक मिळवत ‘मंत्रालय लिपिक’ पदाला गवसणी घातली.
दरम्यान, पल्लवी 2022 साली देखील ‘मंत्रालय लिपिक’ पदासाठी निवड झाली होती. असे असताना तिने 2021 साली झालेल्या निवडीला प्राधान्य देत ऑक्टोबर 2023 मध्ये मंत्रालय लिपिक या पदाची जबाबदारी स्विकारली. तसेच तिची सध्यास्थितीत एमएससीच्या टॅक्स असिस्टंट पदासाठीची स्कील टेस्ट प्रलंबित आहे.
यश मिळाल्यानंतरच्या भावना –
मंत्रालय लिपीक पदासाठी निवड झाल्यानंतरच्या भावना व्यक्त करताना पल्लवीने सांगितले की, माझी ज्यावेळी निवड झाली त्यावेळी अगदी डोक्यावरचा भार कमी झाल्यासारखं वाटतं होतं. कुटुंबियांना आपण आता आधार देऊ शकतो, याच मला मोठा आनंद वाटत होता. गुलालाचा रंग अंगावर चढल्यानंतरचा आनंद हा शब्दात व्यक्त करण्यासारखा नव्हता. आमच्या घरी आनंदाचा क्षण साजरा झाला. वडिलांनी शिक्षणासाठी दिलेली साथ आणि माझ्यावर दाखवलेला विश्वास हे अत्यंत महत्वाचे होते आणि मला मिळालेल्या यशाने त्याचे सार्थक झाले. माझ्या मुलींचा मला अभिमान असल्याची भावना माझ्या वडिलांनी व्यक्त केल्याचेही पल्लवीने सांगितले.
तरूणांना मोलाचा सल्ला –
तरूणाईला मार्गदर्शन करताना पल्लवी म्हणाली की, एमपीएससीमध्ये श्वासतता नसते. प्रत्येकाला त्याच्या प्रयत्नानुसार त्याचे ध्येय साध्य करणण्यासाठी वेळ लागू शकतो. यासाठी संयम फार महत्वाचा आहे. अभ्यासासोबत तसेच आपल्या ध्येयासोबत सातत्य असले पाहिजे. सोशल मीडियाचा वापर शक्यतो टाळला पाहिजे. सध्यास्थितीत ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी अनेक स्त्रोत उपलब्ध झालेले आहेत. मात्र, यासाठी ठरावीक स्त्रोताची निवड करत त्याचा सतत अभ्यास करत स्वतःला अपडेट ठेवले पाहिजे.
हेही वाचा : आई-वडील दोघांचं शिक्षण फक्त पाचवी, पण पोरानं नाव काढलं! बुलढाण्याचा श्रीकृष्ण झाला IAS