एरंडोल, 28 जुलै : तालुक्यातील खडके येथील बालगृहात वर्षभरात पाच अल्पवयीन मुलींवर काळजीवाहकानेच लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी काळजीवाहक अधीक्षक व सचिव अशा तीन जणांविरुद्ध पोक्सो व अॅट्रॉसिटी कायद्यानुसार बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळजीवाहक गणेश शिवाजी पंडित ( वय ३२) आणि अधीक्षिका अरुणा गणेश पंडित (२९) यांना अटक केली आहे. तर सचिव भिवाजी पाटील हा फरार आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण :
एरंडोल तालुक्यातून एका गावातील मुलींचे वस्तीगृहातील पाच अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण तेथील काळजीवाहकानेच केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराबाबत सरकार पक्षातर्फे स्वतः पोलिसांनी फिर्याद दाखल केली असून त्या फिर्यादीवरून काळजीवाहक तसेच काळजीवाहकाला साथ देणारी त्याची पत्नी वस्तीगृहाच्या अधीक्षका तसेच सचिव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी अटकेत आहेत. तर पीडित मुलींना बालसुधार गृहात दाखल करण्यात आले आहे.
वर्षभरापासून अत्याचार –
गेल्या वर्षभरापासून संस्थेचा काळजीवाहक गणेश पंडित हा पाच अल्पवयीन मुलींवर अत्याचार करत होता. मुलींनी याबाबत अधीक्षिका आणि सचिव यांच्याकडे तक्रार केली, मात्र त्यांनी दुर्लक्ष केली. नंतर मुलींनी याबाबत महिला आणि बालकल्याण समितीपुढे तक्रार केली. समिती सदस्यांपुढेच मुलींचे जबाब घेण्यात आले आणि त्याचे चित्रीकरण करण्यात आले.जिल्हा महिला बालविकास अधिकारी तसेच बालकल्याण समिती जळगाव बेंच ऑफ मॅजिस्ट्रेट यांनी पीडित मुलींना जिल्हा परिविक्षा आणि अनुरक्षण संघटनेच्या बालसुधार तात्पुरत्या स्वरूपात दाखल केले आहे. या मुली 9 ते 12 या वयोगटातील आहेत.
आरोपी पोलिस कोठडीत –
उपनिरीक्षक शरद बागल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिन्ही आरोपींच्या विरोधात पोक्सो कायदा तसेच अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदान्वये गुन्हा दाखल केला आहे. गणेश आणि अरूण यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.