ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 21 सप्टेंबर : पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथे पिंपळगाव (हरे.) पोलीस स्टेशनच्यावतीने दुर्गा मंडळांची शांतता बैठक पार पडली. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांनी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेबाबत दुर्गा मंडळातील अध्यक्ष, सदस्य तसेच ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. तसेच आपलं मंडळ म्हणून आपली जबाबदारी ही अध्यक्ष तसेच सदस्यांनी स्वीकारून यंदाचा नवरात्रोत्सव शातंतेत पार पाडावा, असे महत्वाचे आवाहन कल्याणी वर्मा यांनी केले.
एपीआय कल्याणी वर्मा यांनी केले महत्वाचे आवाहन –
एपीआय कल्याणी वर्मा यांनी सातगाव डोंगरीतील दुर्गा मंडळांची माहिती जाणून घेतली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, नवरात्रोत्सव उत्साहात साजरी करा. मात्र, कायदा व सुवस्थेसाठी योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. आपलं मंडळ म्हणून आपली जबाबदारी ही अध्यक्ष तसेच सदस्यांनी स्वीकारून कुठेही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घेतली पाहिजे.
दरम्यान, दुर्गा मंडळांनी नियमप्रमाणे उत्सव साजरी केला तर पोलीस प्रशासनाचे देखील पुर्णपणे सहकार्य असेल, अशी ग्वाही देखील एपीआय वर्मा यांनी दिली. तसेचरात्री अकरा वाजेपर्यंत लाऊडस्पीकरला परवानगी असून अकरा वाजेनंतर लाऊडस्पीकर सुरू ठेवल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही एपीआय वर्मा यांनी दिला.
‘एखाद्या मंडळावर गुन्हा दाखल झाला; तर…’
नवरात्रोत्सव अथवा गणेशोत्सव काळात कुठल्याही सार्वजनिक मंडळावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला तर ते मंडळ कायम स्वरूपी बाद केले जाते. तसेच मंडळातील सदस्यांना भविष्यात गावात साजरी होणारे नवरात्रोत्सव, गणेशोत्सव तसेच पोळा अशा सार्वजनिक उत्साहांमध्ये सहभागी होता येणार नाही. तसेच नोटिसा बजावून जिल्ह्याबाहेर काढले जाईल. यामुळे आपले मंडळ अडचणीत न येण्यासाठी कुठलेही कृत्य होणार नाही, याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांनी केले.
देवीचा उत्सव हा धार्मिकतेचा उत्सव असून नवरात्री तसेच विसर्जनावेळी कोणीही मद्य प्राशन करू नये. कुठेही काही अनुचित प्रकार निदर्शनास आले तर तात्काळ पोलिसांनी याबाबची माहिती द्यावी. तसेच मंडळामध्ये किती सदस्य आहेत याची यादी तयार करून ती आमच्याकडे द्यावी, असेही कल्याणी वर्मा म्हणाल्या. याप्रसंगी सरपंच उषाबाई सुभाष पाटील, बाळु वाघ, देविदास वाघ, सदस्य सतीश पाटील, रामदास आप्पा पाटील, दत्तु पाटील पोलीस पाटील, मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.