भुसावळ : रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर प्रवेश करण्यासाठी हे तिकीट आवश्यक आहे. त्यामुळे प्रवाशांना रेल्वे स्टेशनवर सोडण्यासाठी आलेले नातेवाईकांना आधी प्लॅटफॉर्म तिकीट काढावे लागते. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने आगामी काळातील सणांच्या पार्श्वभूमीवर या प्लॅटफॉर्म तिकिटांबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री तात्पुरती बंद –
सणासुदीच्या काळात रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे आगामी होळी सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर होणारी गर्दी नियंत्रित करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामध्ये भुसावळ विभागातील तीन रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्यात येत आहे.
प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवरील निर्बंध हे 10 ते 16 मार्चपर्यंत असतील. यामध्ये भुसावळ विभागातील भुसावळसह नाशिक आणि मनमाड या स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री प्रतिबंधित असेल. तसेच ज्येष्ठ नागरिक आणि वैद्यकीय गरजा असलेल्या लोकांना या निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे, असे रेल्वे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
काय असते प्लॅटफॉर्म तिकीट –
प्लॅटफॉर्म तिकीट हे तिकीट प्रवासासाठी वैध नसते. तुम्ही या तिकीटाने ट्रेनमध्ये प्रवास करू शकत नाही. या तिकीटाची किंमत साधारणपणे 10 रुपये असते. हे तिकीट तुम्ही रेल्वे स्टेशनच्या तिकीट खिडक्यांवर खरेदी करू शकता. किंवा तुम्ही हे तिकीट मोबाईल ॲपवरून देखील बुक करू शकता. रेल्वेच्या नियमांनुसार, प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी केल्यापासून तुम्ही फक्त 2 तास स्टेशनवर थांबू शकता. म्हणजेच प्लॅटफॉर्म तिकिटाची वैधता फक्त 2 तास आहे. जर तुमच्याकडे प्लॅटफॉर्म तिकीट नसेल तर रेल्वे स्टेशनवर प्रवेश करता येणार नाही, आणि तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. रेल्वे स्टेशनवरील सुरक्षेच्या दृष्टीने हे तिकीट आवश्यक आहे.
हेही वाचा – ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ बंद होणार का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितली महत्त्वाची माहिती