जळगाव, 2 ऑगस्ट : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून देशभरातील शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला. या पार्श्वभूमीवर देशभरात ‘पी.एम. किसान उत्सव दिवस’ साजरा करण्यात येत असून, जळगाव जिल्ह्यातही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण व विशेष आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कृषी विज्ञान केंद्र, जळगावच्या माध्यमातून करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील शेतकरी बांधवांशी संवाद साधत योजनेविषयी विचार मांडले आणि त्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयांचा हप्ता जमा केल्याचे जाहीर केले. जळगावमधील अनेक शेतकऱ्यांनी मोबाईलवर मेसेजद्वारे हप्त्याचा संदेश मिळाल्याचे सांगत समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार श्रीमती स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात डॉ. सय्यद शाकीर अली, प्रमुख शास्त्रज्ञ, भारतीय कृषी अनुसंधान परिषद (अटारी, पुणे), कुर्बान तडवी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, डॉ. हेमंत बाहेती, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, कृषिभूषण समाधान पाटील यांचाही मंचावर सहभाग होता.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी जळगाव जिल्ह्यातील प्रमुख पिकांमध्ये – विशेषतः कापूस व केळी – मूल्यवर्धन, ब्रँडिंग व कौशल्याधारित प्रशिक्षण गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र व कृषी महाविद्यालयाच्या समन्वयाने शेतकऱ्यांसाठी 1 ते 4 महिन्यांच्या कालावधीतील प्रशिक्षण आयोजित करावेत, असे आवाहन केले.
खासदार स्मिता वाघ यांनी बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या यामार्फत शेतकऱ्यांचे आर्थिक सशक्तीकरण झाल्याचे सांगून तालुकास्तरावर अधिकाधिक कार्यक्रम घेण्याची गरज व्यक्त केली. आ. सुरेश ( राजू मामा ) भोळे यांनी शेतकऱ्यांना 20 वा हप्ता मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करून अभिनंदन केले.
प्रास्ताविक करताना डॉ. हेमंत बाहेती यांनी योजनेचे महत्त्व विशद केले. डॉ. सय्यद शाकीर अली यांनी शेतकऱ्यांनी नवतंत्रज्ञानाचा अवलंब करून यांत्रिकीकरण, प्रक्रिया आणि मूल्यवर्धनाच्या माध्यमातून शेतीमध्ये स्थैर्य निर्माण करावे, असे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात जिल्ह्यातील प्रगत व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेविषयी माहितीपर सादरीकरण करण्यात आले. शेतकऱ्यांना योजनांची माहिती मिळावी, पारदर्शकता राहावी आणि योजनांचा प्रभाव अधिक व्यापक व्हावा, या उद्देशाने आयोजन केले गेले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव सूर्यवंशी यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. शरद जाधव यांनी केले.