चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली, 12 मे : प्रत्येक प्रकारच्या दहशतवादविरोधात आपल्या सर्वाचं एकजूट राहणं आणि आपली एकता ही सर्वात मोठी शक्ती आहे. निश्चितपणे हे युग युद्धाचं निश्चित नाहीये पण हे युग दहशतवाद्यांचं देखील नाहीये. यामुळे दहशवादाच्या मुद्द्यावर कुठलीही तडजोड केली जाणार नसून पाकिस्तानसोबत चर्चा होईल ती फक्त दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीर या मुद्द्यांवरच होईल, अशी स्पष्ठ भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रात्री आठ वाजता देशवासियांना संबोधित करताना मांडलीय.
दहशतावादी आणि चर्चा, दहशतवादी आणि व्यापार हे एकाच वेळी होऊ शकत नाही. यासोबतच पाणी आणि रक्त हे देखील एकाच वेळी वाहू शकत नाही,असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. दरम्यान, देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे नाव घेत थेट प्रहार केलाय.
ऑपरेशन सिंदुरबाबत पंतप्रधान मोदी काय म्हणाले? –
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, आमच्या माता-बघिंनीच्या कपाळावरून सिंदुर हटविण्याचा परिणाम काय होतो? हे आज प्रत्येक दहशतवादी तसेच दहशतवाद्यांच संघटन यांना माहित झालंय. यामुळे ऑपरेशन सिंदुर हे फक्त नाव नसून या देशाच्या कोटी-कोटी जनतेच्या भावानांचं प्रतिक आहे. ऑपरेशन सिंदुर हे न्यायाची अखंड प्रतिज्ञा आहे. 6 मे रोजीच्या रात्री उशिरा आणि 7 मे रोजीच्या सकाळी या प्रतिज्ञेला परिणामांमध्ये बदलताना पाहिलंय.
भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळांवर आणि त्यांच्या प्रशिक्षण केंद्रावर अचूक प्रहार करत ते उद्ध्वस्त केले. दरम्यान, दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नव्हती की, भारत इतका मोठा निर्णय घेऊ शकेल. मात्र, जेव्हा राष्ट्र एकत्र होतं आणि राष्ट्र सर्वोच्च असते तेव्हा असे कठोर निर्णय घेतले जातात, अशा भावना पंतप्रधान मोदी यांनी ऑपरेशन सिंदुरबाबत माहिती देताना व्यक्त केल्या आहेत.
आपल्या सैन्यानं दहशतवाद्यांना एका झटक्यात संपवलं –
आम्ही भारतीय लष्कराला पूर्ण मोकळीक दिली आणि त्यानंतर लष्कराने कारवाई करत पाकिस्तानचे दहशतवादी तळे उद्ध्वस्त केली. यामुळे दहशतवाद्यांचे प्रशिक्षण केंद्रच नाही तर त्यांच्या आत्मविश्वाला ठेच पोहचविण्याचं काम ऑपरेशन सिंदुरने केलंय. दहशतवाद्यांनी आमच्या माता-बघिनींचं सिंदुर हिरावलं होतं. यामुळे थेट दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रांनाच भारतीय सैन्याने उडवलं. दहशतवाद्यांच्या आकांना तसेच भारताविरोधात कट रचणाऱ्या दहशतवाद्यांना एका झटक्यात आपल्या सैन्यानं संपविण्याचं काम केलं असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानवर जोरदार प्रहार –
भारताने दहशतवाद्यांना दिलेलं हे जोरदार प्रत्युत्तर पाहून पाकिस्तान घाबरला होता. खरंतर, पाकिस्तानने दहशतवादाविरोधात भारताची साथ देण्याऐवजी भारतातच हल्ले करायला सुरूवात केली. भारतातील प्रार्थना स्थळे, सर्वसामान्य नागरिकांची घरे तसेच सैन्य दलाची कॅम्पमध्ये हल्ला घडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारताने दिलेल्या प्रत्युत्तरापुढे पाकिस्तान अपयशी झालं. यावेळी जगाने पाहिलं की, भारतासमोर पाकिस्तानची ड्रोन कशापद्धतीने परतवून लावली. भारताच्या सशक्त एअर डिफेन्स सिस्टमने पाकिस्तानच्या ड्रोन हल्ले-मिसाईलला आकाशातच नष्ट केले.
पाकिस्तानची तयारी सीमेवर युद्ध करण्याची होती. मात्र, भारताने पाकिस्तानच्या छातीतच वार केला. भारताच्या ड्रोन आणि मिसाईलने अचूकतेने हल्ला केला आणि पाकिस्तानच्या हवाई तळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. भारताने पहिल्या तीन दिवसातच पाकिस्तानला एवढं उद्धवस्त करून टाकलं की त्यांना याचा अंदाजही नव्हता. यानंतर तणाव करण्यासाठी पाकिस्तानने जगभर हात पसरला, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.
दरम्यान, पाकच्या डीजिएमओने 10 मे रोजी भारतच्या डीजीएमओंसोबत फोनवरून संपर्क साधला. मात्र, तोपर्यंत भारताने दहशतवाद्यांच कंबरडं मोडलं होतं. आणि म्हणून पाकच्या डीजिएमओने शस्त्रसंधीबाबत सांगितले. यानंतर भारताने देखील शस्त्रसंधीबाबत होकार दिला. दरम्यान, मी पुन्हा सांगतो की, आम्ही पाकिस्तानच्या दहशतादी तसेच सैन्य ठिकाणांवर प्रत्युत्तराच्या कारवाईला स्थगित केलीय. मात्र, येत्या दिवसांत आम्ही पाकच्या प्रत्येक पावलांना तो कोणता पवित्रा हाती घेतात, याचं आम्ही मूल्यमापन करू, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, दहशतवादाविरोधातील लढाई ही एका सुंदर जगाची शाश्वती आहे. असे असताना पाकिस्तानी सैन्य आणि त्यांचं सरकार ज्यापद्धतीने दहशतवादाला खत-पाणी घालाताएत. तेव्हापासून ते पाकिस्तानाला संपवायला जात आहेत. पाकिस्तानला जर वाचायचं असेल तर त्यांच्या देशातील दहशतवाद्यांचा त्यांना खात्मा करावाच लागेल.
ऑपरेशन सिंदुर हे दहशतवाद्यांविरोधात भारताची निती –
आमचे सैन्यदल, नौदल, वायुदल, बीएसफ आणि भारताचे अर्धसैनिक बल सातत्याने अलर्ट मोडवर आहेत. सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईकनंतर ऑपरेशन सिंदुर हे आता दहशतवाद्यांविरोधात भारताची निती आहे.
ऑपरेशन सिंदुरने लढाईत एक नवी रेषा ओढलीय. ती पुढील तीन मुद्यांप्रमाणे…
1. भारतावर जर दहशतवादी हल्ला झाला तर आम्ही आमच्या पद्धतीने दहशतवादविरोधात कठोर कारवाई करू.
2. आम्ही न्यूक्लिअर ब्लॅकमेल सहन करणार नाही. न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंगच्या नावखाली वाढत असलेल्या दहशतवादाविरोधात भारत अचूक आणि निर्णायक प्रहार करेल.
3. आम्ही दहशतवाद पुरस्कृत सरकार आणि दहशतवाद्यांच्या आकांना वेगवेगळं पाहणार नाही. त्याविरोधात आम्ही धोरणात्मक पावले उचलू.
भारताच्या मेड इन इंडियाच्या हत्यारांची प्रामाणिकता सिद्ध झाली –
ऑपरेशन सिंदुरदरम्यान जगाने पाकिस्तानचं अगणित सत्य पाहिलंय की, ज्यावेळी दहशतवाद्यांच्या अंतिम निरोप देण्यासाठी पाकिस्ताचे मोठ-मोठे अधिकारी उपस्थित होते. स्टेट स्पॉनर्सचा हा सर्वात मोठा पुरावा आहे. आम्ही भारत आणि आमच्या नागरिकांना वाचविण्यासाठी सातत्याने निर्णायक पाऊले उचलत राहू. युद्धाच्या मैदानावर भारताने पाकिस्तानला प्रत्येकवेळी धूळ चारलीय आणि यावेळेस ऑपरेशन सिंदुरने एक नवीन आयाम जोडला गेला आहे. या ऑपरेशन दरम्यान भारताच्या मेड इन इंडियाच्या हत्यारांची प्रामाणिकता सिद्ध झाली, असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले.
भारताच्या सशस्त्र दलांना सेल्यूट –
आज बुद्ध पौर्णिमा. भगवान बुद्धाने आम्हाला शांतीचा मार्ग दाखवला. शांतीचा मार्ग देखील शक्तीच्या मार्गाने जातो. मानवता शांती आणि समृद्धीच्या दिशेने प्रगती करो. प्रत्येक भारतीय हा शांततेने जगू शकेल. तसेच विकसित भारताच्या स्वप्नला पुर्ण करण्यासाठी भारताचं शक्तीशाली होणं अत्यंत गरजेचे आहे आणि आवश्यकता पडली तर या शक्तीचा उपयोग करणे देखील गरजेचे आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत ही शक्ती दाखवण्याचं काम भारतानं केलंय. यामुळे भारताच्या सशस्त्र दलांना सेल्यूट करतो. भारतीयांच्या प्रोत्साहनाला तसेच एकजुटीला आणि संकल्पाला मी नमन करतो. धन्यवाद. भारत माता कि जय.
हेही वाचा : भारत-पाक युद्ध थांबलं! भारतानं काय साध्य केलं अन् काय गमावलं?; डॉ. सतीश ढगे यांची विशेष मुलाखत